Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

२० वर्षांनंतर ठाकरे घराणं पुन्हा एकत्र; बीएमसी २०२६ आधी ऐतिहासिक युती

Spread the love

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेची अधिकृत युती जाहीर

शिवतीर्थावर संयुक्त पत्रकार परिषद; बाळासाहेब ठाकरे यांच्या छायेखाली घोषणा

मराठी अस्मिता, बीएमसी निवडणूक आणि मुंबईच्या राजकारणात मोठा राजकीय संकेत

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा आणि भावनिक क्षण. बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय वारसा पुढे नेणारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. बीएमसी निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अधिकृतपणे युती जाहीर केली आहे.

मुंबईतील शिवतीर्थावर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या ऐतिहासिक युतीची घोषणा करण्यात आली. दोन्ही नेत्यांनी याला केवळ राजकीय नव्हे, तर वैचारिक आणि भावनिक एकजूट असल्याचं स्पष्ट केलं. अनेक वर्षांपासून या क्षणाची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

भावनिक क्षण, जुन्या आठवणींना उजाळा

या युतीकडे पाहताना अनेक ज्येष्ठ शिवसैनिक भावुक झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेसोबत असलेले ८०-९० वर्षांचे कार्यकर्ते, आज पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं पाहून भावूक झाले. हा केवळ राजकीय निर्णय नसून, अनेकांसाठी तो भावनिक पुनर्मिलनाचा क्षण आहे.

‘मराठी माणसांसाठी मंगलदिवस’ – संजय राऊत

शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले,

“आजचा दिवस मराठी मानूसासाठी मंगलमय आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश जसा आला होता, तसाच आज राज आणि उद्धव मराठी अस्मितेसाठी मंगल कलश घेऊन आले आहेत.”

बाळासाहेबांचीच छबी, कुणाचाही अहंकार नाही

या ऐतिहासिक घोषणेत सर्वाधिक लक्ष वेधून घेतली ती पोस्टरवरील एकच प्रतिमा बाळासाहेब ठाकरे. उद्धव किंवा राज यांचा फोटो न ठेवता देण्यात आलेला हा संदेश स्पष्ट आहे. “ही युती व्यक्तींसाठी नाही, तर विचारांसाठी आहे.”

या युतीसोबतच शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबतही एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली.

“युतीत प्रत्येकाला हवं ते मिळेलच असं नाही. जो जिंकू शकतो, त्यालाच जागा – हा निकष असायला हवा,” असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी मांडलं.

मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट

उद्धव–राज युतीमुळे बीएमसी निवडणूक, मुंबईचं सत्ताकेंद्र आणि मराठी मतदारांची दिशा बदलू शकते. ठाकरे घराण्याची ही पुन्हा एकत्रित वाटचाल महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू करणारी ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.


Shop On Amazon

आपलं सरकार

Click to listen highlighted text!