Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RajThackerayNewsUpdate : राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ ‘ बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त , मुख्यमंत्री , गृहमंत्री याच्यात महत्वाची बैठक

Spread the love

मुंबई / औरंगाबाद : रमजान आणि सर्व सण शांततेत पार पडल्यानंतर राज्यातील पोलीस यंत्रणा मनसे नेते राज ठाकरे यांच्या विरोधात सक्रिय झाली असल्याचे वृत्त असून त्यांच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे . दरम्यान राज्यातील सर्व मनसे कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिस दिल्या असून राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ ‘ या  घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. 

मशिदींवरील भोंगे हटवले नाही तर उद्या राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यावरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत . त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली असून  महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कट आखण्यात आला असल्याचा अलर्ट गुप्तचर विभागाने दिला आहे.

राज्याबाहेरील लोक महाराष्ट्रात..

इतर राज्यामधील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचे  गृह विभागाने सांगितले आहे. दरम्यान राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी बाहेर व्यक्ती राज्यात धुडगूस घालण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पोलिसांना महत्त्वाच्या सूचना दिल्या असून कारवाईचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहखात्याकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. कायदेशीर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालकांन आदेश दिले आहे. आज दुपारीच मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्यात फोन वरून चर्चा केली असल्याचे वृत्त आहे.

औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी ४  मे पासून मशिदीवरील भोंगे बंद नाही झाले तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावावी, असे निर्देश  कार्यकर्त्यांना दिले. राज ठाकरेंनी दिलेल्या या अल्टीमेटम नंतर गृहविभागही अलर्ट झाले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

शिवतीर्थावर पुढील रणनिती

मनसैनिकांना पोलिसांनी बजावलेल्या नोटीस संदर्भात मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी म्हटले आहे की , मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीसा देण्यात आल्या असून अनेकांना पोलिसांनी मुंबई बाहेर थांबा असे  म्हटले  आहे, याच्या निर्वाणीच्या इशाऱ्याने हे सर्व घाबरले आहेत म्हणून कारवाईची भीती दाखवत आहेत. आज शिवतीर्थवर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होईल आणि त्यात पुढील रणनिती ठरेल.

मनसे नेते महेश भानुशाली यांना अटक

मुंबई  पोलिसांनी मनसे नेते महेश भानुशाली यांना घाटकोपरमधून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातून भोंगे जप्त केले आहेत. तसेच हनुमान चालिसा पठण करण्यासाठीचे साहित्यदेखील जप्त करण्यात आलं आहे.

महेश भानुशाली घाटकोपरमधील चांदिवली मतदारसंघात मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्या कार्यालयातील भोंगे ताब्यात घेतले आहेत. तसंच उद्याच्या आंदोलनासाठी जमा केलेलं साहित्यही जप्त केलं आहे

अभी नही तो कभी नही.. राज आपल्या भूमिकेवर ठाम

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे भोंगे हटावच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘अभी नही तो कभी नही..’  सांगत देशभरातील हिंदूंना राज ठाकरे पत्राद्वारे आवाहन करणार आहे. या पत्रकात राज ठाकरे भोंग्याविरोधातील भूमिका कशी योग्य आहे हे लोकांना मुद्द्यांसह पटवून देणार असल्याचे  सांगण्यात येत आहे.

औरंगाबादेत दखल झालेला गुन्हा नेमका कोणता ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेत १२ अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला १६ अटी घालून परवानगी दिली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११६, ११७, १५३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून अशोक गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ अन्वये अटी शर्तीं भंग करणे हा गुन्हा आहे. कलम १५३ अन्वये दोन समूहात भांडण लावणे, ११६ कलमाखाली गुन्हा करण्यासाठी मदत, कारावासाच्या शिक्षेस पात्र गुन्ह्यास उत्तेजन देणे आणि 117कलमाखाली गुन्ह्याला मदत करणे, चिथावणीखोर भाषण करणे, भारतीय दंड संहितेच्या कलम 117 नुसार, जो कोणी सामान्य लोकांद्वारे किंवा दहापेक्षा जास्त व्यक्तींच्या संख्येने किंवा कोणत्याही समुदायाद्वारे गुन्हा करण्यास मदत करणे, या गुन्ह्यास दंड आणि तीन वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांचा इशारा

दरम्यान औरंगाबादमधील सभेला ज्या अटी आणि शर्थी घातल्या होत्या तेव्हाच आम्हाला समजले होते की , हे सर्व यांच्यावर गुन्हे  दाखल करण्यासाठी सुरू आहे. पण राज ठाकरे आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि महाराष्ट्र सैनिक साहेबांच्या आदेशांचे  पालन करतील असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले  आहे. राज ठाकरेंविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत बोलत असताना त्यांना अटक केली जाऊ शकते , असे विचारण्यात आले  असता संदीप देशपांडे यांनी असे  झाल्यास मनसैनिक रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला आहे.

राज ठाकरे यांना भाजपचा पाठिंबा

भाजपही मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली असून त्यांचा बचाव कार्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की , राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून सरकार मनसैनिकांना संदेश देऊ पाहत आहे. की , आमच्याविरोधात बोललात तर कायद्याचा वापर करून तुम्हाला पूर्णपणे दाबू, असे सरकार सुचवू पाहत आहे.

राज्य सरकारलाच शांतता नको आहे. अशाप्रकारे धरपकड,नोटीस किंवा अटक करून हिटलरशाही पद्धतीने शांतता राखता येईल, असा सरकारचा समज आहे का? पण राज्य सरकार हिंदुत्वाची चळवळ जितकी दडपण्याचा प्रयत्न करेल, तितकी ती उसळी मारून वर येईल, असेही दरेकर यांनी म्हटले.

राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा कोर्टाचे वॉरंट

दरम्यान २०१२ मधील एक प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सांगलीतील शिराळा कोर्टाने वॉरंट काढले आहे. हे प्रकरण 10 वर्षे जुणे आहे. विशेष म्हणजे 6 एप्रिल रोजी वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीच कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल कोर्टाने पोलिसांना विचारला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सांगली जिल्ह्यात मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी जवळ आंदोलन करून दुकानांची तोडफोड केली होती. यानंतर याबाबतचा गुन्हा शिराळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे जिल्हाअध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासहित अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल आहे. या खटल्यामध्ये राज ठाकरे यापूर्वी एकदा न्यायालयात हजर देखील झाले होते. मात्र पुढील तारखांना गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने आता राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट काढले  आहे.

ठाण्याच्या सभेत तलवार दाखवल्या प्रकरणातही गुन्हा दखल

औरंगाबादच्या पोलिसांच्या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ठाण्यात झालेल्या सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव व रविंद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ठाण्यात झालेल्या सभेत त्यांच्या भाषणापूर्वी राज ठाकरे यांना तलवार भेट देण्यात आली होती. राज ठाकरे यांनीही ही तलवार म्यानातून बाहेर काढून उंचावली होती. याच कारणावरुन आता राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी सार्वजनिक कार्यक्रमात तलवार उंचावल्याप्रकरणी मोहित कंबोज, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!