Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RahulGandhiUpdate : काय आहे प्रकरण ? मैत्रिणीचे लग्न , राहुल गांधींचा नेपाळ दौरा , भाजप आणि कॉँग्रेस ..

Spread the love

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या आपल्या मैत्रिणीच्या  लग्नात सहभागी होण्यासाठी नेपाळच्या दौऱ्यावर आहेत. त्याच लग्नाच्या पार्टीतील राहुल यांचा व्हिडिओ शेयर करत भाजप नेत्यांनी त्यांच्या या दौऱ्यावर टीका सुरू केली आहे. भाजपकडून त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरव्हायरल  केला गेला असून भाजप आणि त्यांच्या समर्थकांकडून त्यांना ट्रोल केले जात आहे. त्याला काँग्रेसने प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी मित्र राष्ट्रात जाणे हा गुन्हा नाही. तर कॉँग्रेसकडूनही भाजपनेत्यांचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत. 

यासोबतच, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुलीच्या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अचानक हजेरी लावली होती याचे त्यांना स्मरण नाही का ? असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, “राहुल गांधी नवाझ शरीफ यांच्यासोबत केक कापण्यासाठी पंतप्रधान मोदींसारखे निमंत्रित पाहुणे म्हणून पाकिस्तानात गेले नाहीत आणि पठाणकोटमध्ये काय होते ते आम्हाला माहित आहे.”

राहुल गांधी यांचा हा वैयक्तिक मुद्दा..

ते म्हणाले की, राहुल गांधी मित्र देश नेपाळमध्ये पत्रकाराच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी गेले आहेत आणि त्यात गैर काहीच नाही, खरे तर ही आपल्या संस्कृतीची बाब आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही. कदाचित पंतप्रधान आणि भाजप लवकरच ठरवतील की एखाद्याच्या लग्नाला उपस्थित राहणे हा गुन्हा आहे. भाजपनेते अमित मालवीय यांच्या ट्विटला उत्तर देताना राहुलच्या समर्थनार्थ अनेकांनी ट्विट केले आणि लिहले की, तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे.

मंगळवारी काठमांडू पोस्टने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, राहुल गांधी इतर तिघांसह सोमवारी काठमांडूला पोहोचले. राहुल गांधी त्यांची नेपाळी मैत्रीण, सीएनएनच्या  माजी पत्रकार आणि आता लुंबिनी संग्रहालयाच्या  कार्यकारी संचालक सुम्निमा उदास यांच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी काठमांडूमध्ये आहेत. मंगळवारी लग्न असून गुरुवारी रिसेप्शन होणार असल्याचे वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.

कोण आहे सुम्निमा उदास ?

नेपाळी वृत्तपत्र ‘द काठमांडू पोस्ट’नुसार, राहुल गांधी नेपाळमधील त्यांची मैत्रीण सुम्निमा उदास हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडूला आले आहेत. सुमनिमाचे वडील भीम उदास यांनी सांगितले की, आम्ही राहुल गांधींना मुलीच्या लग्नात येण्याचे निमंत्रण दिले होते. भीम उदास हे नेपाळचे म्यानमारचे राजदूत राहिले आहेत. त्यांची मुलगी सुम्निमा ही सीएनएनची माजी वार्ताहर आहे.

राहुल गांधी यांची मैत्रीण सुम्निमा उदास हिचे लग्न नीमा मार्टिन शेर्पासोबत होणार आहे. अमेरिकेतील ली विद्यापीठातून त्यांनी पत्रकारिता केली आहे. याशिवाय त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीही घेतली आहे. तिने सीएनएन या वृत्त संस्थेसाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्काराचे प्रकरणही त्यांनी कव्हर केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये सुम्निमा उदास यांनी ‘अमेरिकन जर्नालिस्ट ऑफ द इयर’चा पुरस्कारही जिंकला होता.

सुम्निमा दास यांचे लग्न आज होणार असून रिसेप्शन 5 मे रोजी होणार आहे. सुम्निमाचे लग्न निमा मार्टिन शेर्पासोबत होणार आहे. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राहुल एका नाईट क्लबमध्ये काही लोकांसोबत पार्टी करत आहे. राहुलच्या आजूबाजूला उपस्थित असलेले लोक दारू पितात.

काँग्रेसनेही जावडेकरांपासून वाजपेयींपर्यंतचे फोटो केले शेअर

दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नाईट क्लबचा व्हिडिओ व्हायरल होताच काँग्रेसही राहुल गांधींच्या बचावात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची जुनी छायाचित्रे आणली आहेत.

भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी ट्विट केले आहे की , खूप वर्षांपूर्वी भारतात… माजी पंतप्रधान, भारतरत्न, दिवंगत श्री अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या पत्नीसोबत मद्यपान करताना दिसले होते. त्यावेळी त्यावर कोणताही वाद झाला नाही. तो काळ वेगळा होता.

श्रीनिवास यांनी  माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांचा एक फोटोही शेअर केला ज्यामध्ये ते शॅम्पेन उडवताना  दिसत आहेत.हा  फोटो शेअर करताना त्यांनी  लिहिले आहे की , ‘ओळख कोण ‘?

दरम्यान त्यांनी नवाझ शरीफ यांच्यासोबतचा पंतप्रधान मोदींचा फोटोही शेअर केला असून त्यावर लिहिले आहे की , काठमांडूच्या खासगी दौऱ्यावर लग्नाच्या कार्यक्रमाला जाणे हा गुन्हा आहे आणि विना निमंत्रण पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाणे ही कट्टर देशभक्ती आहे का?

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!