Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraPoliticalUpdate : राज ठाकरे यांना अजित पवार यांनी असे धू धू .. धुतले ..!!

Spread the love

नाशिक : औरंगाबादच्या बहुचर्चित सभेत राज ठाकरे यांनी पुनः एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्ला बोल करताच राष्ट्रवादीकडून राज यांना कडक उत्तरे दिली जात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर  “छत्रपती शिवराय आमच्या नसानसात आहेत. हा कोण टिकोजीराव विचारतो आम्हाला…?, अशा शब्दात पलटवार केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आपल्या भाषणात शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही, असा आरोप सलग तीन सभांमधून राज ठाकरे यांनी केला. त्यांच्या याच आरोपांना अजित पवार यांनी ही प्रत्युत्तर दिले आहे. 

राज ठाकरे यांनी आपल्या तासाभराच्या भाषणात  जवळपास २० मिनिटे पवारांवर खर्ची घातली. पवार जातीयवादी असल्याचा पुनरुच्चार करत पुरंदरे केवळ ब्राह्मण होते म्हणून पवारांनी त्यांना त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला. राज ठाकरेंच्या याच आरोपांवरती आज राज्यातील नेते त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. येवल्यात झालेल्या सभेत त्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकांवर कडाडून हल्ला चढवला.

राज यांच्या आरोपांना  उत्तरे देताना अजित पवार म्हणाले की , “पवारसाहेब फक्त शिवाजी महाराज, फुले, शाहू , आंबेडकरांचे  नावच घेत नाही. तर त्यांच्या विचारांवर चालण्याचं काम करतात आणि त्यांनी आम्हालाही त्यांच्या विचारांवर चालण्याचा वारसा शिकवला. महापुरुषांचं फक्त नावं घेऊन राजकारण करायचं नसतं, त्यांच्या नावावर दुकानदारी चालवायची नसते, तर त्यांच्या विचारांवर देखील चालायचं असतं”, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.

“छत्रपती शिवाजी महाराज आमच्या रक्तात आहे, श्वासात आहे, नसानसात आहे, ध्यासात आहे, हा कोण टिकोजीराव आम्हाला विचारतो शिवाजी महाराजांबद्दल……? केवळ तोंडदेखलं नाव घेऊन आपली दुकानदारी चालवणाऱ्यांना शिवाजी महाराज समजले नाहीत. ते जर असेच वागत राहिले, तर त्यांना शिवाजी महाराज कधीच समजणार नाही”, असा शाब्दिक वारही अजित पवार यांनी केला.

राज ठाकरेंचं भाषण म्हणजे नुसत्या नकला..

“यांचं भाषण म्हणजे काय, यांची नक्कल कर, भुजबळ साहेबांची नक्कल कर… माझी नक्कल कर… जयंत पाटलांची नक्कल कर… तुम्ही नकलाकार आहे की भाषण करायला जाता…? सगळ्यांना सगळं काही बोलता येतं, पण जरा भान ठेवायचं असतं, आमच्याकडून एखादा शब्द चुकला तर आम्ही माफी मागतो, ही आपली पद्धत आहे, यांनी मात्र सगळं सोडून द्यायचं आणि चांगलं वातावरण गढूळ करायचं, याचा विचार सगळ्यांनी करावा”, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.

सत्ता गेली पण विद्यापीठाला बाबसहेबांचं नाव दिलं..

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ५० वर्षांचं राजकारण लोककल्याणासाठी केलं. शरद पवार सत्तेसाठी कधीच हापापलेले नाहीत. अनेक आमदारांचा विरोध असताना त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. सत्ता गेली तरी बेहत्तर पण मी बाबासाहेबांचं नाव देणार, अशी घोषणा करून त्यांनी ते करून दाखवलं.

पठ्ठ्यानं आतापर्यंत सोसायटी काढली नाही आणि पवारसाहेबांवर बोलतो..

पवारसाहेब राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री होते, देशाचे १० वर्ष कृषिमंत्री होते, संरक्षण मंत्री होते, काही वेगळा प्रसंग देशामध्ये घडला तर सर्वांना एकत्र आणण्याचं काम पवारांनी केलं. यांचं जेवढं वय आहे, तेवढा पवारसाहेबांचा अनुभव आहे, हे काय गप्पा मारतायत.. पठ्ठ्यानं आतापर्यंत सोसायटी काढली नाही आणि पवारसाहेबांवर बोलतो”, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला.

लोकांच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम करतोय..

१९९५ ते १९९९ ज्यावेळी भाजप सेनेचं सरकार होतं, त्यावेळी यांना पण काहीतरी कामं करता आली असती ना… जो व्यक्ती काही लोकांच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम करतोय, त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात एखादा साखर कारखाना काढला का? कुठली सुतगिरणी उभी केली का?,कुठली शिक्षण संस्था काढली का? काय केलं त्यांनी??, ठीक आहे आपण काही केलं नाही, मग दुसऱ्यांची संस्था उभी करायला मदत केली? कधी कुणासाठी शब्द खर्ची केला.. कधी कोणतं विकासाचं व्हिजन दाखवलं..”

अरे माणसांचे संसार उभे करायला डोकं लागते, अक्कल लागते..

“अहो साधी विकास सोसायटी काढली नाही पठ्ठ्यानी… दूध सोसायटी नाही… टरबूज खरबूज सोसायटी नाही… कापूस सोसायटी नाही… मजूर सोसायटी नाही. हे सोसायटी प्रकरण तर त्यांना कळतंच नसेल… नुसतं उचलायची जीभ लावायची टाळ्याला… अरे माणसांचे संसार उभे करायला डोकं लागते, अक्कल लागते.. धुडगूस घालायला आणि मोडतोड करायला अक्कल लागत नाही. आज वेगळ्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम सुरु आहे. आज आपण सगळे गुण्या-गोविंदाने नांदतोय ना.. कुठे अडचण आहे..?”, असं म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरेंवर हल्ला चढवला.

संध्याकाळी दिवस मावळल्यावर बाबाची सभा सुरु होणार!

“संध्याकाळी दिवस मावळल्यावर बाबाची सभा सुरु होणार, यांची दुपारची सभा कधी ऐकली का? दुपारी सभा घ्यायचे कधी कष्ट घेतले का? निव्वळ काहीतरी लोकांना बनविण्याचं काम करायचं, हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राला परवडणारं नाही. सध्याचं राजकारण एका विचित्र दिशेला जाताना दिसतंय, राजकीय स्वार्थापोटी ही मंडळी समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम करतायत”, असं टीकास्त्रही अजित पवारांनी सोडलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!