Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : ‘सिल्व्हर ओक’ बंगला हल्ला प्रकरणी गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात , हत्येचा कट रचल्याचा सदावर्ते यांचा खळबळजनक आरोप

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावरील हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली असून पोलिसांनी एसटी  कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न  सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून सदावर्ते यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईच्या विरोधात बोलताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी  ‘आमची हत्या करण्याचा कट रचला जात असून इतरही कष्टकऱ्यांचा मृत्यू व्हावा, अशी सरकारची इच्छा आहे,’ असा खळबळजनक आरोप केला आहे.

सदावर्ते यांनी म्हटले आहे कि , एखाद्या अतिरेक्यासारखं मला नेलं जात आहे. माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. वकिली पेशावर गदा आहे. पोलिसांनी आपल्याला कोणीतीही नोटीस न देता ताब्यात घेतलं आहे. गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांच्याविरोधात आपल्या पत्नीने तक्रार केली आहे. माझ्या जीवाला धोका आहे. माझा खून होऊ शकतो. माझी हत्या होऊ शकते, असा गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतले  आहे. एसटी कर्मचाऱ्यांना चिथावल्याचे  बोलले  जात आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चिथावले  आणि भडकवले , याचे पुरावे मुंबई पोलिसांकडे असल्याचे  सांगण्यात येत आहे.

आंदोलक १०५ कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून अटक

शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी १०५ एसटी कर्मचाऱ्यांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सर्व १०५ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या सर्वांना शरद पवार यांच्या घराच्या परिसरातून ताब्यात घेऊन हि कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबई पोलिसांना याबाबत कडक कारवाईचे आदेश  मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे आणि सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना दिले आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे  गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची कुणीतरी दिशाभूल केली आहे. हल्लामागे कोणीतरी सूत्रधार आहे, असा संशय वळसे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आंदोलक एसटी कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया…


दरम्यान १२४ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. अनेक महिला विधवा झाल्या. अनेक संसार उघड्यावर आले. एकही राजकीय नेता आझाद मैदानात फिरकला नाही. आंदोलनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या धक्काबुक्की दोन महिला बेशुद्ध झाल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांबाबत आजही कारवाई करण्याची भाषा सरकारकडून करण्यात येत आहे. आमच्यावर बळजबरी झाली तरी माघार घेणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा उद्रेक सुरूच राहणार. आता आम्हाला गावदेवी पोलीस ठाण्यात घेऊन जात आहेत.
– वैशाली पाटील, संपकरी एसटी कर्मचारी


….तेंव्हा मी कोर्टात होतो , आंदोलनाची माहिती नाही : सदावर्ते

सिल्व्हर ओक बंगल्यावरील हल्ला प्रकारणांनंतर बोलताना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी  खुलासा करताना म्हटले आहे कि ,  एसटी आंदोलक ‘सिल्व्हर ओक’वर धडकले तेव्हा मी मुंबई उच्च न्यायालयात होतो. याठिकाणी एका खटल्यासंदर्भात युक्तिवाद सुरु होता. माझा युक्तिवाद सव्वाचारच्या सुमारास संपला. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मला सिल्व्हर ओकवरील आंदोलनाविषयी माहिती दिली. तेव्हा मला या सगळ्याबद्दल कळाले, असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

दरम्यान सरकारला आमच्या हत्येचा कट रचून एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाची सुनावणी न्यायालयात होऊ द्यायची नव्हती आणि कष्टकऱ्यांचे अधिकाधिक मृत्यू कसे होतील, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात होते, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. ‘न्यायालयाने उद्या सकाळी एसटी विलीनीकरणाबाबत सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीवेळी मी सरकारची पोलखोल कशी करतो हे तुम्ही बघाच. सरकारच्या हुकूमशाहीचे, एकाधिकारशाहीचे आणि गैरवर्तणुकीचे पुरावे मी कागदपत्रांसह उद्या समोर आणणार आहे आणि एसटी कामगारांचा विलीनीकरणाचा लढा विजयाकडे नेणार आहे,’ असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

 हत्येच्या कटाचा काही नेत्यांवर केला आरोप

गुणरत्न सदावर्ते यांनी हत्येच्या कटाचा आरोप करताना राज्यातील काही ज्येष्ठ नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. ‘आम्ही नवाब मलिक यांच्या विरोधात आहोत, आमच्या याचिकेनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली आणि आता जयश्री पाटील यांनी विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी आमच्या हत्येचा कट रचला आहे,’ असा दावा सदावर्ते यांनी केला आहे.

हल्ला करणारे लोक एसटीच कर्मचारी आहेत किंवा नाही, याची मला खात्री नाही…

या आंदोलनानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी खोटी माहिती दिली. उच्च न्यायालयाचा निर्णय कष्टकऱ्यांच्या विरोधात गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, न्यायालयाने विलिनीकरण समितीच्या अहवालाला आव्हान देण्यात यावे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. एसटी आंदोलकांनी सिल्व्हर ओकवर धडक दिली त्याला ‘हल्ला’ म्हणू नका. जर ते कष्टकरी फुले, शाहू, आंबेडकर आणि श्रीरामाचे नाव घेत असतील तर ते हल्ला करणार नाहीत. या आंदोलकांमधील महिला खूप व्यथित होत्या. त्या चक्कर येऊन पडल्या, त्यांच्या बांगड्या फुटल्या. त्या हल्लेखोर असत्या तर त्यांना चक्कर कशी आली असती, असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला. शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला असेल तर मी त्याचे समर्थन करणार नाही. मात्र, हल्ला करणारे लोक एसटीच कर्मचारी आहेत किंवा नाही, याची मला खात्री नाही, असेही सदावर्ते यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!