Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : ‘सिल्व्हर ओक’ बंगला हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री संतप्त , हल्लेखोरांवर कडक कारवाईचे निर्देश

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील आंदोलनाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले असून यावर मुख्यमंत्र्यांनीही संताप व्यक्त केला आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे कि ,  ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांच्या घरावर अचानक झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून यास जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाडलेला नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे कि , एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करीत असले तरी राज्य शासनाने कधीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले नाही. महामंडळाचा कर्मचारी आमचाच आहे या भावनेतून जितके जास्तीत जास्त आर्थिक व सेवाविषयक लाभ देता येतील ते आम्ही दिले. मुंबई उच्च न्यायालयात याविषयीची माहिती वेळोवेळी सादर केली. न्यायालयाने सुद्धा त्याची नोंद घेत एसटीच्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास सांगितले आहे. कर्मचाऱ्यांनी देखील याचे स्वागत केल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहचत असतानाच अचानक आज दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एक जमाव पोहचून घोषणाबाजी करत दगडफेक व चप्पलफेक करतो ही कृती अतिशय अनुचित व कुणालाही न पटणारी आहे. अशाप्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे, अशा सूचना मी गृहमंत्र्यांना दिल्या आहेत.

दरम्यान , या निंदनीय घटनेला प्रत्युत्तर म्हणून कुणीही कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचेल असे कृत्य करू नये. एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भल्यासाठी नेहमीच शासन त्यांच्याबरोबर राहील, मात्र या कर्मचाऱ्यांच्या संसाराच्या राखेवर कुणी आपल्या पोळ्या भाजू नयेत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ताज्या माहितीनुसार  शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाईची पावले टाकायला सुरुवात केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!