IndiaNewsUpdate : आधीच महागाई त्यात औषधांच्या किमतीही १२ टक्क्यांपर्यँत वाढल्या ….

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे एक एप्रिलपासून जीवनावश्यक असणारी ताप, खोकला, सर्दी, शुगर, बीपी, दमा, इन्फेक्शन, उच्च रक्तदाब, अशक्तपणा यावर उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधे महाग झाली आहेत. पॅरासिटामॉल, फेनोबार्बिटोन, फेनिटोइन सोडियम, अजिथ्रोमाइसिन, सिप्रोफ्लोक्सासिन हायड्रोक्लोराइड आणि मेट्रोनिडाझोल या औषधांच्या किमतीही वाढल्या आहेत. अशाप्रकारे ८०० औषधांच्या किमती १० ते १२ टक्क्यांनी वाढल्या असल्याचे वृत्त आहे.
औषधी कंपन्यांच्या मागणीनुसार नॅशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने शेड्यूल्ड औषधांच्या किमतीत 10.9 टक्के वाढ जाहीर केली आहे. ज्या औषधांच्या किमती वाढण्याची घोषणा करण्यात आली आहे, त्यांची गणना अत्यावश्यक औषधांच्या श्रेणीत केली जाते. यामध्ये प्रतिजैविक, दाहक-विरोधी औषधे, कान-नाक आणि घशाची औषधे, जंतुनाशक, वेदनाशामक, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल औषधे आणि बुरशीविरोधी औषधे यांचा समावेश आहे.
Government doesn't control prices of essential medicines, clarifies Mansukh Mandaviya
Read @ANI Story | https://t.co/LuUeRYde69#MansukhMandaviya pic.twitter.com/rPZAAUfSd1
— ANI Digital (@ani_digital) April 4, 2022
सरकारने किमती वाढवल्या नाहीत : केंद्रीय आरोग्यमंत्री
दरम्यान यावर बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे कि , ‘अत्यावश्यक औषधांच्या किंमती केंद्र सरकारने वाढवल्या नाहीत. या औषधांच्या किंमतींवर सरकारचे नियंत्रणही नाही’. सोमवारी मीडियाशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘सरकारने औषधांच्या किमती वाढवल्या नाहीत, यावर केंद्र सरकारचे काहीच नियंत्रण नाही. अशा औषधांच्या किंमती या घाऊक किंमत निर्देशांकावर अवलंबून असतात. जर हा निर्देशांक वर गेला तर अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढतात आणि निर्देशांक खाली गेल्यास किंमतीत घट होते.’ मांडविया पुढे म्हणाले की, घाऊक निर्देशांकाशी संबंधित काही आवश्यक औषधांमध्ये आपोआप चढ-उतार दिसून येतात. या औषधांच्या किंमती फक्त काही रुपयांमध्ये आहेत. त्यामुळे यात काही वाढही झाली, तरीदेखील ती काही पैशांनीच होईल. या औषधांच्या किमती वाढवण्याबाबत सरकारची कोणतीही भूमिका नसून किमतीत वाढही केलेली नाही किंवा तशी कोणतीही योजनाही नसल्याचे त्यांनी सांगितले.
अशा आहेत काही औषधांच्या वाढलेल्या किमती
अजिथ्रोमाइसिन – १२० रुपये
सिप्रोफ्लोक्सासिन – ४१ रुपये
मेट्रोनिडाझोल – २२ रुपये
पॅरासिटामॉल- (डोलो ६५०) – ३१ रुपये
फेनोबार्बिटोन – १९.०२ रुपये
फेनिटोइन सोडियम – १६.९० रुपये
स्वस्त औषधांचा पर्याय असा आहे…
औषधांच्या किमती वाढल्या असल्या तरी अनेक वैद्यकीय व्यावसायिक अत्यल्प मारजींवर व्यवसाय करून ग्राहकांना 15% ते 20% डिस्काउंट देतात, अशी दुकाने ग्राहक निवडू शकतात. याशिवाय 1mg, NetMeds, PharmEasy, LifCare, MyraMed सारख्या अनेक ऑनलाइन वेबसाइट्सवरूनही सवलतीच्या दरात औषधे मिळू शकतात. विशेष करून विविध डॉक्टर्स , दवाखाने याठिकाणी असलेल्या मेडिकल स्टोअर्समधून कोणत्याही सवलतीशिवाय औषदांची विक्री केली जाते हे ग्राहकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच शासकीय रुग्णालयातही स्वस्तात औषध मिळू शकतात. स्वस्त औषधासाठी आणखी एक पर्याय म्हणजे कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये एकाच प्रकारचे औषध ब्रँडेड आणि जेनेरिक स्वरूपात उपलब्ध असते. त्यात तुम्ही जेनेरिक औषध घेण्यास प्राधान्य देऊ शकता. रुग्णांना स्वस्तात औषध मिळावे यासाठीच सरकारने प्रत्येक जिल्ह्यात जेनेरिक औषध केंद्रे सुरू केली आहेत. त्याचा पर्याय आपण निवडू शकतो.