MaharashtraNewsUpdate : राज्य सेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचे निकाल जाहीर , येथे पहा सर्व निकाल…
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 2021 या वर्षातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान कोरोनाचा संसर्ग कमी होताच दि. 23 जानेवारी 2022 ला एमपीएससी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. या पूर्व परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे असे विद्यार्थी थेट मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. मात्र त्याआधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काही सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार एमपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा काही अटींच्या अधीन राहून देता येणार आहे. मुख्य परीक्षेआधी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पात्रता तपासणी करण्यात येणार आहे. या पात्रता तपासणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील अशा उमेद्वारानाच मुख्य परीक्षा देता येणार आहे. तसेच जे उमेदवार मुख्य परीक्षा देण्यासाठी आयोगामार्फत देण्यात आलेल्या तारखेच्या आधी अर्ज भरतील आणि शुल्क भरतील अशा उमेदवारांनाच मुख्य परीक्षेला बसता येणार आहे.
या असतील अंतिम अटी
उमेदवारांची आवश्यक ती पात्रता तपासणी झाल्यानंतर तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पूर्व परीक्षेचा निकाल हा कोणत्याही आरक्षणाच्या / समांतर आरक्षणाच्या / इतर मुद्यांसंदर्भात विविध मा.न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात आला आहे.
प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळवण्यात येणार आहे. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवश्यक माहिती आणि परीक्षा शुल्क विहित मुदतीत दिलेल्या पद्धतीने सादर करणे आवश्यक असेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी जी माहिती पूर्व परीक्षेआधी आयोगाच्या वेबसाईटवर दिली होती तीच माहिती मुख्य परीक्षेसाठी स्वीकार्य असणार आहे. याशिवाय कोणतीही माहिती असल्यास आयोगाचा निर्णय असणार आहे.
या सर्व बाबींची तपासणी झाल्यानंतरच पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा ही येत्या 7, 8 आणि 9 मे 2022 रोजी घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी या परीक्षेची तयारी सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.