Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : आमदारांना मुंबईत घरे देण्यावरून राज्य सरकारवर टीकास्त्र

Spread the love

मुंबई : सर्वपक्षीय आमदारांसाठी मुंबईत कायमस्वरूपी घरे देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केल्यानंतर राज्यसरकारच्या या निर्णयावर मोठी टीका केली जात आहे. मुंबईत स्वस्तात कायमस्वरूपी घर मिळावे अशी सर्वपक्षीय आमदारांची मागणी होती. विशेष म्हणजे गेल्याच आठवडय़ात आमदार निधीत एक कोटी वाढ करून तो पाच कोटी रुपये करण्यात आल्यावर, आता आमदारांना आता कायमस्वरूपी घरे देण्याची घोषणा झाल्यानंतर या निर्णयाचे आमदारांनी बाके वाजवून आपला आनंद व्यक्त केला जात असला तरी भाजपने यावरून सरकारला घेरले आहे.  

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयावर नाराजी जाहीर केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “आमदार पळून जातील आणि सरकार पडेल या भीतीनेच हा वर्षाव केला जात आहे. दोन कोटींचा आमदार निधी करोना असतानाही चार कोटी केला, आता पाच कोटी केला. ड्रायव्हरचे, सहाय्यकाचे पगार वाढवले. त्यात आता घरं दिली जाणार आहेत. कशासाठी घर पाहिजेत?”.

प्रत्येकाची चार चार घरं आहेत…

“माझं मुंबईत घर नाही. पण तरीही हे पैसे तुम्ही शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना द्या यासाठी मी आग्रही असेन. माझ्यासारखे आणि सदाभाऊ खोत यांच्यासारखे सोडले तर प्रत्येकाची चार चार घरं आहेत, शिवाय स्वखर्चाने घरे घेण्याची क्षमता  आहे. आमदार व्हा म्हणून कोणी नारळ, निमंत्रण दिलं नव्हतं की तुम्ही आमदार व्हा म्हणून घर मिळेल, पाच कोटी मिळतील. त्यामुळे आमदारांचा रोष सहन करत मी हे योग्य नसल्याचं सांगत आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

आ. राम कदम यांचा सवाल

दरम्यान आमदारांना मोफत घरे देण्याच्या निर्णयाबाबत आ. राम कदम यांनी प्रथम प्राधान्य कोणाला?  शहीद विधवा पत्नीला? कोविड काळात प्राण गमावलेल्या पोलिसाला? ज्यांच्या डोक्यावर छत नाहीत अशा कोविड काळात सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, कंपाऊंडर इतर कर्मचारी, प्राधान्य कोणाला? अशी विचारणा त्यांनी पत्रातून केली आहे. “सभागृहात आमदारांना मोफत घरे देणार असा निर्णय जाहीर केलात. निर्णयाला विरोध असण्याचा कारण नाही. मात्र या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात. देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या संरक्षणार्थ धारातीर्थी पडणाऱ्या शहीद सैनिकांच्या लहान कच्चाबच्चांना, त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांना, त्यांच्या निराधार विधवा पत्नीला, ज्याच्या डोक्यावर छत नाही अशा कुटुंबांना अगोदर मोफत घरे देणार? की सरकार म्हणून आधी स्वत:चच भल म्हणत आमदारांना देणार?,” अशी विचारणा राम कदम यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्टीकरण

या विषयावरून झालेल्या वादाला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे कि , “आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे”. दरम्यान शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आमदार घरासाठी पैसे देत असतील तर त्यात काही अयोग्य नसल्याचे  म्हटले आहे.मनसेनेही सरकारच्या या निर्णयावरून विरोध केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!