MumbaiCricketUpdate : आयपीएल २०२२ : वानखेडे स्टेडियमची रेकी करणारा दहशतवादी एटीएसच्या ताब्यात

मुंबई : २६ मार्चपासून आयपीएल स्पर्धेचा १५ व हंगाम सुरु होत असताना एटीएसकडून धक्कादायक बातमी आली आहे . या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मुंबई एटीएसने अटक केलेल्या एका दहशतवाद्याने वानखेडे स्टेडिअम बरोबरच नरिमन पॉईंटचे ट्रायडंट हॉटेल तसेच खेळाडूंचा हॉटेल ते स्टेडिअमपर्यंतच्या मार्गाची रेकी केल्याची कबुली दिली आहे.
याबाबत एटीएसने दिलेल्या माहितीनुसार स्टेडिअम परिसरासह खेळाडूंचा मुक्काम असलेल्या हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर सामना अधिकारी, अंपायर तसेच अन्य कर्मचाऱ्यांनाही सुरक्षा देण्यात येणार आहे. मॅचच्या दरम्यान हॉटेल ते स्टेडियमच्या मार्गात पार्किंगलाही मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शीघ्र कृती दल, बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलिसांच्या विशेष टीमला तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या स्पर्धेसाठी सर्व टीमचे खेळाडू, कोचिंग स्टाफ मुंबईत दाखल झाला आहे. यंदा आयपीएलमधील साखळी फेरीतील सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन शहरांमध्ये होणार आहे. दरम्यान एटीएसच्या सतर्कतेमुळे संबंधित दहशतवाद्याला अटक केल्यामुळे आयपीएल स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून सर्व स्पर्धा सुरक्षित पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत ७० साखळी सामने होणार आहेत. २६ मार्च ते २२ मे या कालावधीमध्ये हे सर्व सामने महाराष्ट्रात होणार आहेत. या संपूर्ण कालावधीमध्ये खेळाडू तसेच आयपीएलच्या संबंधित सर्व व्यक्तींसाठी ही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.