Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RussiaUkraineCrisisUpdate : मोठी बातमी : किवमधील भारतीय दूतावास बंद , सर्व भारतीयांना ३ दिवसात परत आणण्याचा केंद्राचा निर्धार

Spread the love

नवी दिल्ली :  रशिया-युक्रेन संघर्षामुळे वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कीवमधील भारतीय दूतावास बंद करण्यात येत असून  युक्रेनमधून भारतीयांच्या परतीसाठी ३ दिवसांत २६ उड्डाणे पाठवली जातील असे केंद्र सरकारने सूचित केले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना भारतात पार्ट आणण्यासाठी केंद्र सरकरने आपल्या हालचाली अधिक तीव्र केल्या आहेत. दरम्यान युक्रेनच्या खार्किवमध्ये काल  सकाळी झालेल्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विद्यार्थ्यांच्या मृत्युप्रती त्याच्या कुटुंबियांशी बोलताना आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. 


रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात भारत सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. पंतप्रधानांच्या बैठकीनंतर, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी पत्रकारांना सांगितले की युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी येत्या तीन दिवसांत २६ उड्डाणे चालवली जातील. बुखारेस्ट आणि बुडापेस्ट व्यतिरिक्त पोलंड आणि स्लोव्हाकमधील विमानतळांचाही वापर केला जाईल, असे ते म्हणाले.

अशी आहे विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याची योजना

मिशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेअंतर्गत ८ मार्चपर्यंत ४६ उड्डाणे चालवण्यात येणार आहेत. २६ फेब्रुवारीपासून ही उड्डाणे सुरू आहेत. यामध्ये बुखारेस्टहून २९ फ्लाइट, बुडापेस्टहून १० फ्लाइट, रझेझोहून ६ फ्लाइट, कोसीसेहून एक फ्लाइट समाविष्ट आहे. भारतीय हवाई दल बुखारेस्टसाठी विमान चालवणार आहे. याबद्दल माहिती देताना परराष्ट्र सचिव म्हणाले, “जेव्हा आम्ही पहिली सूचना जारी केली तेव्हा आम्ही अंदाज लावला की २०,००० विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत. तेव्हापासून, सुमारे १२,००० लोकांनी युक्रेन सोडले आहे, ज्याची टक्केवारी  युक्रेनमधील आमच्या एकूण नागरिकांच्या 60 टक्के आहे. “उर्वरित ४० टक्‍क्‍यांपैकी जवळपास निम्मे लोक खार्किव, सुमी येथील संघर्ष क्षेत्रात आहेत आणि उरलेले निम्मे युक्रेनच्या पश्चिम सीमेवर पोहोचले आहेत किंवा पश्चिमेकडे जात आहेत. त्यांना  युक्रेनच्या शेजारील देश रोमानिया, पोलंड किंवा हंगेरीमधून भारतीयांना परत आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आमच्या सर्व नागरिकांनी  कीव सोडले आहे…

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी मंगळवारी सांगितले की आमच्या सर्व नागरिकांनी  कीव सोडले आहे आणि रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांना खार्किव आणि इतर संघर्ष प्रवण भागात अडकलेल्या भारतीयांना “तात्काळ सुरक्षित रस्ता” द्यावा अशी भारताची मागणी कळवली आहे. यापूर्वी, रोमानियातील भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे की युक्रेनमधून आल्यानंतर कोणत्याही भारतीयाला रोमानियाहून विशेष विमानाने जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही. भारत २६ फेब्रुवारीपासून युद्धग्रस्त देशात अडकलेल्या आपल्या नागरिकांना रोमानिया आणि हंगेरी मार्गे घरी आणत आहे. रोमानिया आणि हंगेरी हे युक्रेनचे शेजारी देश आहेत. दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याबाबत ट्विट करून म्हटले आहे कि ,  “आम्ही अत्यंत दुःखाने पुष्टी करतो की खार्किवमध्ये काल सकाळी एका भारतीय विद्यार्थ्याचा गोळीबारात मृत्यू झाला. मंत्रालय त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. आम्ही कुटुंबाप्रती मनापासून शोक व्यक्त करतो.

आतापर्यंत एकूण १९२२ लोक युक्रेनमधून भारतात परतले आहेत.दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसाठी दोन हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. याबाबत बोलताना , केंद्रीय मंत्री सोम प्रकाश म्हणाले की युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांसाठी आणि इतरांच्या मदतीसाठी दोन हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

अधिकृत माहितीनुसार, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे कुटुंब आणि इतरांसाठी होशियारपूरचे खासदार प्रकाश यांनी संबंधित कुटुंबातील सदस्यांना विनंती केली आहे की त्यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबद्दल किंवा इतर कोणाचीही माहिती फॉर्ममध्ये द्यावी. त्यात त्यांचा मोबाईल नंबर, पासपोर्ट नंबर आणि ते राहत असलेल्या युक्रेनमधील क्षेत्र तसेच युक्रेनच्या जवळच्या सीमावर्ती भागांबद्दल माहिती असावी त्यासाठी पुढील हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा.

हेल्पलाइन क्रमांक असे आहेत

9173572-00001 आणि 9198154-25173 

युक्रेनमध्ये अडकलेल्या २२२ भारतीय नागरिकांना घेऊन विमान बुडापेस्टो येथून निघाले

दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या २२२ भारतीय नागरिकांना घेऊन ऑपरेशन गंगा अंतर्गत चौथे निर्वासन उड्डाण हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून उड्डाण केले. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली आहे. युक्रेनच्या शेजारील देशांतील भारतीय नागरिकांच्या स्थलांतर प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी भारत सरकारने तैनात केलेल्या चार ‘विशेष दूतां’पैकी एक पुरी मंगळवारी बुडापेस्ट येथे दाखल झाले. त्यांनी सांगितले की बुडापेस्ट येथून २०० भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन आणखी एक पाचवे विमान लवकरच दिल्लीला रवाना होणार आहे.

युक्रेनमधून भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी ३ दिवसांत होतील २६ उड्डाणे

युक्रेन-रशिया युद्धावरील पंतप्रधान मोदींच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी पत्रकारांना सांगितले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी येत्या तीन दिवसांत २६ उड्डाणे चालवली जातील. बुखारेस्ट आणि बुडापेस्ट व्यतिरिक्त पोलंड आणि स्लोव्हाकमधील विमानतळांचाही वापर केला जाईल, असे ते म्हणाले.

युक्रेनची राजधानी कीवमधील भारतीय दूतावास बंद: सूत्रांनी सांगितले

दरम्यान आता युक्रेनची राजधानी कीवमधील भारतीय दूतावास बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. असे सांगण्यात येत आहे कि ,  कीव मधील दूतावास  दुसऱ्या  शहरात, ल्विव्हमध्ये हलविला जाऊ शकतो. सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. रशियाने राजधानी कीवला चौफेर वेढा घातला असून सातत्याने गोळीबार सुरू आहे. युक्रेनची राजधानी कीवमधील भारतीय  दूतावासात आता  एकही भारतीय शिल्लक नसल्याची खात्री केल्यानंतर बंद करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

युक्रेनच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधून भारतीयांचे, विशेषत: विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करणारी उच्चस्तरीय बैठक घेतली. रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची ही चौथी बैठक आहे. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. सर्व भारतीयांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी त्यांनी भारत सरकारकडे केली. गेहलोत यांनी ट्विट केले, ‘युक्रेनमधील खार्किव येथे भारतीय विद्यार्थी नवीनच्या मृत्यूची दुःखद बातमी अली आहे. मी पुन्हा भारत सरकारला विनंती करतो की, सर्वोच्च स्तरावर चर्चा करून सर्व भारतीयांना युक्रेनमधून सुखरूप बाहेर काढावे. युक्रेनच्या परिस्थितीत कोणत्याही भारतीयांना एकटे सोडले जाऊ नये.

पीएम मोदींनी युक्रेनमध्ये मारल्या गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या वडिलांशी बोलून शोक व्यक्त केला

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये मंगळवारी झालेल्या बॉम्बस्फोटात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृत विद्यार्थ्याच्या वडिलांशी बोलले नवीन शेखरप्पा ग्यानगौदार. भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर पंतप्रधानांनी कुटुंबाप्रती तीव्र शोक व्यक्त केला.

भाजप सरकारच्या हलगर्जीपणामुळे…’: एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूवर अखिलेश यादव

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या, “युक्रेनमध्ये अडकलेल्या नवीन या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी अत्यंत दु:खद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझी तीव्र संवेदना आहे. या दुःखाच्या वेळी देव त्यांना धीर देवो. मी सरकारला विनंती करतो. आमच्या सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.” तरं सपा सुप्रीमो अखिलेश यादव यांनी ट्विट केले, “युक्रेन युद्धात नवीन या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुर्दैवी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! आज भाजप सरकारच्या हलगर्जीपणामुळे एका कुटुंबाने आपले मूल गमावले आहे. जनता पाहत आहे, मंत्री. “निवडणुकीत प्रचार करायला वेळ आहे पण भारतीयांना वाचवायला नाही!

पंतप्रधानांनी  निवडणुकीऐवजी भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यावर भर द्या: काँग्रेस नेते

लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, “भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची हृदयद्रावक घटना ऐकून मला धक्का बसला आणि वेदना झाल्या. पंतप्रधानांनी निवडणुकांऐवजी युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यावर भर द्यावा.” परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या असहाय भारतीय विद्यार्थ्यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. देव त्यांचे रक्षण करो.”

युक्रेनमध्ये ठार झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह भारतात आणण्याचा प्रयत्न : कर्नाटक सीएमओ

कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, हावेरी जिल्ह्यातील नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये मृत्यू झाला. सीएम बसवराज बोम्मई यांनी विद्यार्थ्याच्या वडिलांशी चर्चा केली. नवीनचा मृतदेह भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

युक्रेनमध्ये गोळीबारात ठार झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , “भारतीय विद्यार्थी नवीनचा युक्रेनमध्ये मृत्यू झाल्याची दु:खद बातमी मिळाली. त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती माझ्या मनापासून संवेदना. मी पुन्हा सांगतो की भारत सरकारला सुरक्षित परतीसाठी धोरणात्मक योजनेची गरज आहे. प्रत्येक मिनिट मौल्यवान आहे. ”

‘भारतीय विद्यार्थी जेवण घेण्यासाठी गेला होता, हवाई हल्ल्यात झाला मृत्यू’

युक्रेनमध्ये जीव गमावलेला भारतीय विद्यार्थी बाहेर जेवायला गेला होता. खार्किवमधील विद्यार्थिनी समन्वयक पूजा प्रहराज यांनी एनडीटीव्हीला ही माहिती दिली. खार्किवमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या प्रहराजने विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर एनडीटीव्हीशी संवाद साधला. प्रहराज म्हणाले, “मृत विद्यार्थी जेवण आणण्यासाठी बाहेर गेला होता. वसतिगृहात उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांसाठी आम्ही जेवणाची व्यवस्था करतो, पण तो गव्हर्नर हाऊसच्या मागे एका फ्लॅटमध्ये राहत होता. तो एक-दोन तास रांगेत उभा होता. अचानक हवाई हल्ला झाला, ज्यात गव्हर्नर हाऊस उडवण्यात आले आणि या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.” त्याने सांगितले की एका युक्रेनियन महिलेने त्याचा फोन उचलला आणि सांगितले की फोनच्या मालकाला शवागारात नेले जात आहे.”

युक्रेन आणि रशिया यांच्यात उद्या चर्चेची दुसरी फेरी होणार आहे

रशिया-युक्रेन संघर्षामुळे वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या विशेष आपत्कालीन सत्रादरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांवर निशाणा साधला. एकीकडे, कीवने संयुक्त राष्ट्रांना मॉस्कोविरुद्ध सुरू असलेली आक्रमकता थांबविण्याचे आवाहन केले, तर दुसरीकडे, रशियाने आग्रह धरला की त्यांनी शत्रुत्व सुरू केले नाही आणि त्यांना युद्धही  संपवायचे आहे. UNGA ने काल आणीबाणीच्या विशेष सत्रात युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावावर चर्चा केली. यादरम्यान रशियाने युक्रेनवरील हल्ल्याचा बचाव केला. एकीकडे रशियाकडून युक्रेनवर हल्ले चालूच असून दुसरीकडे युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी आज होणार आहे. बेलारूस सीमेवर पहिल्या फेरीच्या बैठकीच्या दोन दिवसांनंतरही दोन्ही देश कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत. विशेष म्हणजे , रशियन लष्कराने युक्रेनवर आक्रमण आणखी तीव्र केले आहे. दरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युरोपियन संसदेला संबोधित केले. युरोपियन संसदेला संबोधित केल्यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे स्थायी स्वागत झाले. यावेळी बोलताना झेलेन्स्की म्हणाले कि ,  “आम्हाला आमच्या मुलांना जिवंत पाहायचे आहे,”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!