Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : धक्कादायक : ओवैसींना हा फक्त इशारा होता , हिंदू संघटनेकडून हल्लेखोरांचे समर्थन

Spread the love

नवी दिल्ली : “हा हल्ला नाही तर इशारा आहे. हिंदूंच्या विरोधात गरळ ओकणे ओवेसी यांनी तत्काळ बंद करावे,… असे ट्विट करीत हिन्दुसेना नामक संघटनेने एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावरील हल्ल्याचे समर्थन करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. हिंदू सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता याने आज याबाबत एक ट्वीट केले असून त्यात ओवेसी यांना इशारा दिला आहे.


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गुरुवारी मेरठ येथे आलेले असदुद्दीन ओवेसी यांच्यावर दिल्लीला परतताना त्यांच्या कारवर  हापुडातील छिजारसी टोलनाक्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारीच सचिन आणि शुभम अशा दोन्ही हल्लेखोरांना तातडीने अटक केली असून या दोघांचीही १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. दरम्यान या दोन्हीही आरोपींच्या समर्थनसाठी हिंदू सेना नामक संघटना पुढे आली आहे.

या  घटनेवर हिंदू सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता याने एक ट्वीट करत दोन्ही हल्लेखोरांची बाजू घेताना म्हटले आहे कि , ‘ओवेसी यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांना इशारा देणाऱ्या हिंदुत्ववादी सचिन आणि शुभम या दोघांनाही हिंदू सेना सन्मानित करणार आहे आणि कायदेशीर मदत देणार आहे’.  हा हल्ला नाही तर इशारा आहे. हिंदूंच्या विरोधात गरळ ओकणे ओवेसी यांनी तत्काळ बंद करावे, असेही गुप्ता याने म्हटले असून या ट्वीटमध्ये ओवेसी यांना टॅग केले आहे. त्यामुळे हे प्रकरण येत्या काळात आणखीच तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या सप्टेंबर महिन्यातही  खासदार ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर  हल्ला झाला होता. त्या हल्ल्यामागे हिंदू सेनेचा हात होता. हल्ल्याप्रकरणी हिंदू सेनेच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी ओवेसी यांनी तीव्र शब्दांत घटनेचा निषेध केला होता. जगाला कट्टरपंथीयांविरुद्ध लढण्याचा सल्ला देणाऱ्या पंतप्रधानांनी माझ्या घरावर हल्ला करणाऱ्यांना कट्टरपंथी कुणी बनवले याचेही उत्तर द्यावे, असे ओवेसी म्हणाले होते. अशा हल्ल्यांनी मी घाबरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. हिंदू सेनेने आपच्या उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील कार्यालयाचीही तोडफोड केली होती. प्रशांत भूषण यांनी तेव्हा काश्मीरसंबंधी एक विधान केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी आपच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची जबाबदारीही गुप्ता याने स्वीकारली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!