Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

STStrikeUpdate : एसटी कर्मचाऱ्यांच्या सुनावणीत आज मुंबई खंडपीठात काय झाले ?

Spread the love

मुंबई : हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागणीविषयी अंतरिम अहवाल देण्यास सांगितले होते. मात्र, राज्य सरकारने आजच्या अहवालात काहीही संकेत दिलेले नाहीत. विलीनीकरण करण्याविषयीच्या मुख्य मागणीचा प्रामाणिकपणे विचार होईल, असेही राज्य सरकारच्या कृतीतून दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारने आधी काही तरी सकारात्मक विधान करावे. त्यानंतर आम्ही कामावर रुजू होण्याचा विचार करु, असा युक्तिवाद एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात केला. एसटी संपाबाबत सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान एसटी विलिनीकरणाबाबतची पुढील  सुनावणी आता २२ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता होणार असल्याची माहिती  गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.

न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. त्यानंतर एसटी महामंडळतर्फे ज्येष्ठ वकील एस. यु. कामदार यांनी बाजू मांडली. एकूण १३ हजार बसगाड्यांपैकी ३४०० गाड्या सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी उच्च न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनेही यावेळी आपला प्राथमिक अहवाल न्यायालयात सादर केला. अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असे समितीकडून न्यायालयाला सांगण्यात आले.

न्यायालयात कर्मचाऱ्यांची बाजू मांडताना सदावर्ते म्हणाले कि , एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तेव्हा वेतनवाढ ही प्रमुख मागणी नव्हतीच. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण हाच प्रमुख मुद्दा होता. त्यामुळे आता राज्य सरकारने विलीनीकरणाविषयी सकारात्मक भाष्य करावे. त्यानंतरच संपकरी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होतील, असे वक्तव्य अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केले.

५४ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा

या सुनावणीत खंडपीठाने , आता राज्यातील शाळा, कॉलेजेस सुरु झाली असतील आणि विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येणार असतील, तर आता कोर्टाला त्याची योग्य ती काळजी घ्यावी लागेल, असे म्हटले. त्यावर ९० टक्के संपकरी कर्मचाऱ्यांतर्फे आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करून प्रतिदावा केल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. पूर्वी संपकरी कर्मचाऱ्यांपैकी ३४ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. आजच्या घडीला तीच संख्या ५४ वर गेल्याचा दावाही सदावर्ते यांनी केला.

यावेळी न्यायालयाने कर्मचारी विलीनकरणापूर्वी कामावर रुजू होण्यास तयार आहेत का, असा प्रश्न सदावर्ते यांना विचारला. कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मुख्य मागणीवर राज्य सरकार विचार करत असताना आणि तो विषय प्रलंबित असताना संपकरी कर्मचारी आधी कामावर रुजू होणार का?, अशी विचारणा खंडपीठातर्फे करण्यात आली. त्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी सध्या राज्य सरकार प्रश्न सोडवण्याऐवजी कर्मचाऱ्यांवर कारवाई करत सुटले आहे, असे म्हणत सदावर्ते यांनी या प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले.

दरम्यान न्यायालयात आज सुनावणी असल्याने आज सकाळपासून एसटी कर्मचाऱ्यांसह राज्यातील लोकांना निकालाची उत्सुकता होती. सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांकडून विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. तर राज्य सरकारतर्फे अॅड. एस.सी. नायडू यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि वाढीव भत्ते देण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली. तसेच विलिनीकरणाचा विषय मोठा असून त्यासाठी वेळ लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!