Omicron । पंतप्रधानांनी बोलावली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट वाढल्याने पुन्हा सर्वांची चिंता वाढवली आहे. भारतातही केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने सर्व राज्यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची स्क्रिनिंग आणि टेस्टिंग कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
Officials briefed PM Modi about the new Variant of Concern ‘Omicron’ along with its characteristics & impact seen in various countries. Its implications for India were also discussed. PM spoke about the need to be proactive in light of the new variant: PMO pic.twitter.com/vW5YEJlwda
— ANI (@ANI) November 27, 2021
पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीत कोरोना व्हायरस आणि लसीकरण यावर महत्त्वपूर्ण चर्चा होणार असून, या बैठकीत कॅबिनेट सचिव राजीव गौबा, पंतप्रधानांचे सचिव पी. के मिश्रा, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल उपस्थित आहेत. भारतीय आईएनएसएसीओजी (INSACOG) कोविड १९ चा नवा व्हेरिएंट बी.१.१.१५२९ यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अद्याप देशात हा व्हेरिएंट आढळला नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या नव्या व्हेरिएंटचे स्पाइक म्यूटेशन जास्त असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून सँपल्स एकत्र केले जात असून, यातील पॉझिटिव्ह सॅँपल्सला प्राधान्याने बी.१.१.१५२९ तपासणीसाठी पाठवले जात आहेत. आरोग्य मंत्रालय आणि जैवतंत्रज्ञान विभागाने आधीच परिस्थितीचा आढावा घेतला आहे. केंद्राने गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणार्या किंवा जाणार्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कठोर स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करण्यास सांगितले आहे. तसेच केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून आदेश दिलेत की, सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कठोर तपासणी करा. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करा. तर दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी डीडीएमए बैठक बोलावली असून नव्या कोरोना व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.