MaharashtraRainUpdate : जाणून घ्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यात होईल पाऊस ?

मुंबई : देशाती मॉन्सून गेला असला तरी अद्याप महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाळा संपून उत्तरेकडील थंडीची लाट सुरू होते. परंतु यावर्षीचा हिवाळा मात्र याला अपवाद ठरला आहे. दरम्यान अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणांना पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे.
नैसर्गिक बदलाच्या या पार्श्वभूमीवर राज्यात काही दिवस पावसाची स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने आज मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १९ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्यांच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे.
19 Nov; राज्यात पुढच्या 4 दिवसांत (19-22 Nov) मेघगर्जनेसह पावसाची 🌧🌩शक्यता. वारे पण जोरदार असण्याची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच संलग्न मराठवाडा भाग प्रभावित.
3 व 4 दिवशी प्रभाव कमी होण्याची शक्यता. विजा चमकताना बाहेर पडू नका,
– IMD@RMC_Mumbai pic.twitter.com/lgP1sImYr0— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 19, 2021
याशिवाय आज जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजा चमकत असताना, घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. तसेच उद्याही राज्यात कमी अधिक प्रमाणात हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. उद्या एकूण दहा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. उद्या नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दहा जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यांना उद्या येलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईसह उत्तर कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.