Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNCBNewsUpdate : “त्या ” तिघांना कोणाच्या दबावात सोडले ? नवाब मलिक यांचा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सवाल

Spread the love

मुंबई :  मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या ‘क्रूज पार्टीवरील छापा हा बनावट असल्याचा पुनरुच्चार  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला असून या प्रकरणात एनसीबीचे अधिकारी वानखेडे यांच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासल्यास  यातील सत्य बाहेर येईल असे मलिक यांनी म्हटले आहे. नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर आणि भाजपवर हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी काही फोटो व व्हिडिओ दाखवत एनसीबवर प्रश्नांचा पाऊस पाडला आहे. तसेच, या प्रकरणात भाजप पदधिकाऱ्यांसह तीन जणांच्या नावांचा आणि त्यांना एनसीबीच्या कचाट्यातून सोडवणाऱ्या भाजपनेत्याच्या नावाचाही गौप्यस्फोट केला आहे.

सोडण्यात आलेले तिघे जण भाजपशी संबंधित

नवाब मलिक त्यांनी केलेल्या दाव्यानुसार ‘एनसीबीने ताब्यात घेतलेल्या ११ जणांमध्ये रिषभ सचदेव, प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला या तिघांना सोडण्यात आले . या तिघांना का सोडण्यात आले ?, रिषभ सचदेव हा भाजपा मुंबईचे माजी सरचिटणीस मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय यांचा मेहुणा आहे.  १३०० लोक सहभागी असलेल्या क्रूझवर छापा टाकून फक्त ११ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली. मात्र, ज्या तीन लोकांना तुम्ही सोडले , त्यांना सोडण्याचे आदेश तुम्हाला कोणी दिले. भाजपच्या नेत्यांनी या तिघांना सोडण्याचा आदेश दिला, अशी माहिती आमच्याकडे असून समीर वानखेडे यांनी याबाबतचा तत्काळ खुलासा करावा असे म्हटले आहे. रिषभ सचदेवा हे राष्ट्रपतींना पण भेटले आहेत, आणि राष्ट्रपती यांनी पुरस्कृत केलेले  आहे. रिषभ सचदेवा यांना २ तासात सोडण्यात आले.  जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा यांचं नाव उघड झालं होतं. यांच्याच बोलण्यावरून आर्यन आला होता, असा खुलासाही मलिकांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

यावेळी बोलताना नवाब मलिक पुढे म्हणाले कि , ‘दिल्ली ते मुंबईतील भाजप नेत्यांनी त्यांच्याशी संबंधित लोकांना सोडवण्यासाठी फोन केले. या सगळ्या कटात भाजपचे नेते सहभागी असल्याने  त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यात आले. हा विषय गंभीर झाला आहे. काही ठराविक लोकांना ताब्यात घेतले जात असून त्यासाठी एनसीबीचा वापर करुन भाजपा महाराष्ट्र सरकाला बदनाम करीत आहे . या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी  चौकशी करावी,’ अशी मागणीही  नवाब मलिक यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते. आर्यन खान व अरबाज मर्चंट यांच्या अटकेच्या वेळी के .पी. गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे? असा सवाल त्यांनी केला होता. नवाब मलिक यांनी एनसीबीकडून क्रूझवर करण्यात आलेली कारवाई ही बनावट असून भाजपाचे काही पदाधिकारी यात सहभागी होते असा आरोप केला आहे. तसंच कारवाई करताना कायद्याचे  पालन करण्यात आले नसल्याचंही त्यांनी म्हटले  होते . नवाब मलिक यांनी आरोप करताना एनसीबी फक्त सेलिब्रेटी आणि त्यांच्याशी संबंधित काही ठराविक लोकांवर कारवाई करत असून राजकीय दबाव असल्याचे  म्हटले होते . याला उत्तर देताना समीर वानखेडे यांनी ते सर्व सरकारी कर्मचारी असून त्याचे  कर्तव्य बजावत होते असे  सांगितले  होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!