AirIndiaNewsUpdate : अखेर “एअर इंडिया”ची मोदी सरकारने केली विक्री , अशा आहेत अति आणि शर्ती …

नवी दिल्ली : केंद्राच्या निर्गुंतवणुकीकरण धोरणांतर्गत तोटयात असलेल्या ‘एअर इंडिया ची मालकी अखेर टाटाला मिळाली आहे. सरकारच्या मालकीची ही विमान कंपनी खरेदीसाठी टाटा समूहाने लावलेली बोली केंद्रातील मोदी सरकारने स्वीकारली आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयातील निर्गुंतवणूक विभाग म्हणजेच ‘दिपम’चे सचिव असणाऱ्या तुहिन कांता पांडे यांनी दिली आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार सरकारला या व्यवहारामधून १२ हजार ९०३ कोटींची अपेक्षा असताना टाटांनी १८ हजार कोटींना ही कंपनी विकत घेण्याची तयारी दर्शवली असून कंपनीवरील सर्व कर्जही टाटाच फेडणार आहेत. सरकार आणि टाटांमधील या करारासंदर्भातील महत्वाची माहिती पांडे यांनी दिल्याचे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या व्यवहारामधील अटी आणि शर्थींसंदर्भातील माहिती ‘दिपम’च्या सचिवांनी दिली आहे. टाटांनी १८ हजार कोटींची बोली लावली होती. ज्यामध्ये १५ हजार ३०० कोटींच्या कर्जाचाही समावेश आहे. हे कर्ज वगळता बाकी रक्कम टाटा कंपनी रोख देणार आहे.
Tatas winning bid of Rs 18,000 cr comprises taking over of Rs 15,300 cr debt and paying rest cash: DIPAM Secretary
— Press Trust of India (@PTI_News) October 8, 2021
पाच वर्षे करता येणार नाही कोणताही बदल
दरम्यान केंद्राने घालून दिलेल्या अटीनुसार टाटा सन्सला एअर इंडिया या ब्रॅण्डमध्ये तसेच लोगोमध्ये पुढील पाच वर्षे कोणतेही बदल करता येणार नाही. तसेच पाच वर्षांनंतर काही हस्तांतरण करायचे झाल्यास ते भारतीय व्यक्तीच्याच नावे करावे लागणार आहे अशी अट घालण्यात आली आहे. तसेच टाटांना पुढील एका वर्षासाठी एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करता येणार नाही. त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून ते कर्मचाऱ्यांना व्हीआरएसच्या माध्यमातून कंपनीमधून कमी करु शकतात, असे सांगण्यात आले आहे.
Tatas will have to retain all employees of Air India for 1 yr; can offer VRS in 2nd yr: Aviation Secretary
— Press Trust of India (@PTI_News) October 8, 2021
टाटा सन्सने १८ हजार कोटींची बोली एअर इंडियासाठी लावली. सरकारने एअर इंडियासाठी राखीव किंमत १२ हजार ९०६ कोटींची ठेवली होती, अशी माहिती देण्यात आली आहे. सरकारला दोन हजार ७०० कोटी रुपये टाटांकडून रोख दिले जाणार आहेत. या मोबदल्यात सरकार आपला कंपनीतील १०० टक्के वाटा टाटांच्या नावे करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Tatas cannot transfer Air India brand, logo for 5 yrs, can transfer to only Indian person after 5 yrs: DIPAM Secretary
— Press Trust of India (@PTI_News) October 8, 2021
पीटीआयच्या वृत्तानुसार एकूण दोन कंपन्यांनी एअर इंडियासाठी बोली लावल्या होत्या. त्यापैकी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने ‘टाटा’च्या बोलीला मंजूरी दिली आहे. टाटांबरोबरच ‘स्पाइसजेट’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनीही निविदा दाखल केली होती. मात्र सर्वश्रेष्ठ बोली लावणाऱ्या टाटांकडे एअर इंडियाचा कारभार सोपवण्यात येणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे.
कोरोनाच्या आधीपासून चालू झाली होती प्रक्रिया
दरम्यान ‘एअर इंडिया’मधील १०० टक्के भागभांडवल विकण्याची प्रक्रिया केंद्राने जानेवारी २०२० पासून सुरू केली होती. शिवाय, तिच्या उपकंपन्या म्हणजेच एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडमधील १०० टक्के हिस्सा आणि एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट्स सव्र्हिसेस प्रा. लि.मधील ५० टक्के हिस्सा विकण्याचे सरकारने प्रस्तावित केले. मात्र कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेस विलंब झाला. नंतर एप्रिल २०२१ मध्ये सरकारने उत्सुक कंपन्यांना पुन्हा वित्तीय बोली लावण्यास सांगितले. बोली लावण्यासाठी १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत दिली गेली होती.