Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्या देशविकासाच्या चार गोष्टी !!

Spread the love

अहमदनगर : देशाच्या विकासात ४ गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाणी, वीज, वाहतूक आणि संपर्क. देशात उद्योग आणायचे असतील, तर उद्योग सुरू व्हायच्या आधी उद्योजक या चार गोष्टी बघतो. उद्योग आला, तर भांडवली गुंतवणूक येते आणि त्यानंतर रोजगार उपलब्ध होतो. गरीबाला जात-धर्म नसतो. त्यामुळे देशातली गरिबी, बेरोजगारी दूर करायची असेल, मजूर आणि शेतकऱ्यांचे कल्याण करायचे असेल तर रोजगाराची निर्मिती करावी लागेल. त्यासाठी या ४ गोष्टींची व्यवस्था करावी लागेल, असे उद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी नितीन गडकरींनी चांगल्या रस्त्यांचे महत्त्व सांगताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे एक वाक्य सांगितले. यावेळी चांगल्या रस्त्यांविषयी बोलताना गडकरींनी ते महाराष्ट्रात मंत्री असतानाची एक आठवण सांगितली. ते म्हणाले कि , “राज्यात मंत्री असताना तेव्हा माझे सचिव असलेल्या तांबेंनी मला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे एक प्रसिद्ध वाक्य सांगितले होते . ते वाक्य होतं ‘अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले झालेले नाहीत. अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत झाली.”

नवीन साखर कारखाने सुरू करण्यास यापुढे परवानगी नाही

दरम्यान, नागपूरमधील साखर कारखानदारीच्या अवस्थेवरून देखील नितीन गडकरींनी यावेळी केलेल्या मिश्किल टिप्पणीनंतर उपस्थितांमध्ये हास्याचे लकेर उमटली. “काल मी आमच्या केंद्रातल्या अधिकाऱ्यांना सांगितले की आमच्याकडे टिश्यू कल्चरचा ऊस लागतो. कारखानदारी म्हणायचे तर कोल्हापूरची साखर कारखानदारी मेरीटमधल्या विद्यार्थ्यांची शाळा वाटते, मराठवाडा म्हणजे फर्स्टक्लासमधल्या विद्यार्थ्यांची शाळा आणि विदर्भ म्हणजे ज्यांना १०० पैकी २० पेक्षा कमी गुण मिळालेत त्यांची शाळा. पण आता आम्ही ५० नर्सरी तयार केल्या आहेत. त्यातून शेतकऱ्यांना रोपं मिळायला लागली आहेत”, असेही गडकरी म्हणाले.

यावेळी दूध उत्पादनाबद्दल बोलताना गडकरी म्हणाले कि , देशात गायी, म्हशींच्या उत्तम जाती आहेत, त्यावर आणखी संशोधन झाले तर दुग्धव्यवसाय वाढू शकतो. जशी रोपवाटिका केली जाते, तशी भरपूर दूध देणाऱ्या गायी तयार करण्याचा प्रकल्प आम्ही उभारणार आहोत. त्या प्रकल्पातून जास्त दूध देणाऱ्या २०० गायी शेतकऱ्यांना देणार आहोत. ‘बेटी बचाव’ प्रमाणे गायीमध्येही अभियान राबवत फक्त कालवडी होतील . दरम्यान आपल्या देशात २५० लाख टन साखर लागते, मागील वर्षी ७० लाख टन जास्त साखर झाली. यापुढं देशात नवीन साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी देता येणार नाही असे सांगून गडकरी यांनी कारखाने चालले पाहिजेत, पण त्यांनी शेतकऱ्यांचे शोषण करू नये असे आवाहन यावेळी बोलताना केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!