MaharashtraCrimeUpdate : सुटी देण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा

नागपूर : नागपूर येथी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ‘मेयो’ येथे तैनात महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक दलाच्या महिला जवानाला शरीरसुखाची मागणी करून तिची छेड काढणाऱ्या पर्यवेक्षकाविरुद्ध तहसील पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. राजू विठ्ठल पाटील (वय ४५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पर्यवेक्षकाचे नाव आहे. या घटनेने मेयो व दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही २८वर्षीय महिला मेयोत सुरक्षारक्षक पदावर कार्यरत आहे. तिला सुटी देण्यासाठी पाटील हा शरीरसुखाची मागणी करायचा, तिला त्रास द्यायचा. ५ सप्टेंबरलाही त्याने महिलेची छेड काढली. महिलेने कुटुंबीयांना याबाबत सांगितले. त्यानंतर तिने तहसील पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी महिलेसह अन्य महिला जवानांची चौकशी केली. त्यानंतर विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी राजू पाटीलला अटक केली आहे.
दरम्यान पाटीलच्या वर्तणुकीमुळे मेयोत तैनात अन्य महिला जवानही त्रस्त असल्याचे उघड होत आहे. पीडित महिलेने जानेवारीतही पाटीलविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पाटीलची बदली करण्यात आली. परंतु, त्याला कार्यमुक्त करण्यात आले नव्हते.