Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : १५ ऑगस्टपासून मुंबईत लोकल सुरु पण कुणासाठी ?

Spread the love

मुंबई: कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून लोकल ट्रेनने प्रवास करता येणार आहे. त्यासाठी नागरिकांची लसीकरण पडताळणी व विशेष मासिक पास देण्याची प्रक्रिया उद्या, ११ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मुंबई महापालिकेने याबाबत सविस्तर माहिती देणारे माहिती पत्रक आज जारी केले आहे.

दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मात्र सध्याच्या पद्धतीनुसारच (कोविड लसीचे डोस घेतलेले असोत वा नसोत) प्रवासाची मुभा राहील, हेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ५३ रेल्वे स्थानकांवर हे पास मिळणार असून मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावरील तिन्ही मार्गावरील स्थानकांचा यात समावेश आहे. या सर्व स्थानकांवर तिकीट खिडकीच्या शेजारी ३५८ मदत कक्ष असतील. सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत सलग ही प्रक्रिया सुरू राहील. आठवड्यातील सर्व दिवस ही प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहणार आहे. मुंबईसह आसपासच्या शहरांतील एकूण १०९ रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध असेल.

पाससाठी पुरावा आवश्यक

कोविड लसीचा दुसरा डोस घेऊन झाल्याचे प्रमाणपत्र (अर्थात, डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनंतर) व ओळखपत्र पुरावा नागरिकांनी सोबत आणणे आवश्यक आहे. यापैकी एकही पुरावा कमी असल्यास रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार नाही. नागरिकांनी घराजवळच्या रेल्वे स्थानकांवर पडताळणीसाठी जावे. मात्र, विनाकारण गर्दी करू नये, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. पडताळणीसाठी आणलेलं कोविड प्रमाणपत्र बनावट आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

अशी होईल पडताळणी?

मदत कक्षातील मुंबई महापालिकेचे कर्मचारी संबंधित नागरिकाच्या कोविड लसीकरण प्रमाणपत्राची वैधता कोविन अॅपवर तपासतील. तसेच, छायाचित्र ओळखपत्रही तपासतील. दोन्ही कागदपत्रे वैध आढळल्यास त्यावर शिक्का मारला जाईल. शिक्का मारलेले कोविड प्रमाणपत्र संबंधितांनी रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर सादर करावे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून मासिक पास देण्यात येईल. हा पास १५ ऑगस्टच्या आधी मिळणार असला तरी प्रवासासाठी तो १५ ऑगस्टपासूनच वैध असेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!