Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी सावध राहण्याची गरज

Spread the love

नवी दिल्ली :  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दिशेने जगाची वाटचाल सुरू असल्याचे असून आठवडाभरात स्पेनमध्ये रुग्णांची संख्या ६४ टक्क्यांनी तर, हॉलंडमध्ये ३३ टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश या पूर्वेकडील देशांमध्येही झपाट्याने रुग्णवाढ झालेली आहे. त्यामुळे भारतानेही सावध राहिले पाहिजे, असे मत करोना कृतिगटाचे प्रमुख व निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केले.


या विषयावर बोलताना पॉल यांनी पुढे म्हटले आहे कि, लसीकरणामुळे करोना रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका कमी होत असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) तमिळनाडूमध्ये केलेल्या पाहणीत आढळले आहे. ‘आयसीएमआर’ने १ लाख १७ हजार ५२४ पोलिसांचे सर्वेक्षण केले असून त्यातील १७ हजार ५९ पोलिसांनी एकही लसमात्रा घेतलेली नव्हती, त्यातील २० पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला. पहिली लसमात्रा घेतलेल्या ३२ हजार ७९२ पोलिसांपैकी ७ कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला तर, दोन्ही मात्रा घेतलेल्या ६७ हजार ६७३ पोलिसांपैकी फक्त चौघांचा मृत्यू झाला. दोन्ही लसमात्रा घेतलेल्या व्यक्तींना करोनाचा संसर्ग झाला तरी मृत्यूचा धोका ९५ टक्क्यांनी कमी होतो, असा निष्कर्ष या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. दोन्ही लसमात्रा घेतल्यानंतरही करोनाचा संसर्ग होऊ शकतो पण, त्याची तीव्रता कमी असते, असे पॉल म्हणाले.

संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता

भारताच्या शेजारी असणाऱ्या बांगलादेशमध्ये प्रतिदिन रुग्णवाढ ११ हजारांहून अधिक, म्यानमारमध्ये साडेचार हजारहून जास्त, इंडोनेशियात दैनंदिन रुग्णवाढ ४४ हजाराहून अधिक तर, मलेशियामध्ये १० हजारांहून जास्त होत आहे. या देशांमध्ये यापूर्वी शिखर काळात झालेल्या रुग्णवाढीपेक्षा ही वाढ तिपटीने जास्त असल्याची माहिती शुक्रवारी केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेनेही संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. पण, नवी लाट कधी येईल यापेक्षा तिची तीव्रता काय असेल हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरेल. भारतात दुसरी लाट अजून संपलेली नाही. काही राज्यांमध्ये दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे. देशातील ४७ जिल्ह्यांमध्ये संसर्गदर १० टक्क्यांहून अधिक आहे, असेही अगरवाल म्हणाले.

दरम्यान सध्या  देशात दैनंदिन ४० हजार रुग्णवाढ होत असून  दुसऱ्या लाटेतील शिखर काळातील रुग्णवाढीच्या तुलनेत ही वाढ १० टक्के इतकी आहे. शिवाय, कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही ९७ टक्के आहे. पण, लोकांचे दळणवळणाचे प्रमाण पूर्वीप्रमाणे नियमित होऊ लागले आहे. शिवाय, लोक मुखपट्टी वापरण्यातही दुर्लक्ष  करू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. मुखपट्टीची लोकांनी सवय करून घेतली पाहिजे, अशी सूचना अगरवाल यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!