Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : “त्या ” १२ आमदारांच्या नियुक्तीवरून उच्च न्यायालयाचे केंद्राला दोन प्रश्न

Spread the love

मुंबई :  राज्याच्या विधानपरिषदेवर राज्यपालांकडून नियुक्त होणाऱ्या १२ सदस्यांच्या जागा रिकाम्याच आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने पाठवलेल्या १२ सदस्यांची यादी अद्याप मान्य केली नाही किंवा अथवा हि यादी फेटाळलीही नाही . या  विषयावरून  गेल्या आठ महिन्यांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये संघर्ष सुरु आहे. दरम्यान या प्रकरणी  मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दोन  प्रश्न विचारले असून त्याचं उत्तर सोमवारपर्यंत म्हणजेच १९ जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.


या प्रकरणी रतन सोली लुथ नामक व्यक्तीने राज्यपाल नियुक्त सदस्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलेल्या १२ सदस्यांच्या याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नसून उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या १२ सदस्यांची नियुक्ती न करण्यात राज्यपालांनी घटनेच्या कलम १६३(१) आणि कलम १७१(५) चं उल्लंघन केल्याचा देखील दावा करण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने  केंद्राला विचारले दोन प्रश्न

दरम्यान, या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपालांना या प्रकरणात प्रतिवादी करता येणार नाही, असं नमूद करतानाच केंद्र सरकारलाच दोन प्रश्न विचारून त्यावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठान हे प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये विधिमंडळातील सर्व सभासदांच्या जागा भरणे हे राज्यपालांचे कर्तव्य असताना ते मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर काहीही न करण्याचा मार्ग स्वीकारू शकतात का? हा पहिला प्रश्न आहे. तर, राज्यपाल अशा प्रकारे निर्णय घेत नसताना त्यांच्या या कृतीला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं का? हा दुसरा प्रश्न आहे.

राज्यपालांकडे दोनच पर्याय

दरम्यान, राज्यपालांना मंत्रिमंडळाने सुचवलेली यादी स्वीकारणे  किंवा नाकारणे हे दोनच पर्याय असल्याचे  राज्य सरकारकडून सुनावणीवेळी सांगण्यात आलं आहे. राज्य सरकारची बाजू मांडणारे वरीष्ठ वकील रफीक दादा यांनी सरकारची भूमिका न्यायालयात स्पष्ट केली. “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एकतर यादी स्वीकारणे  किंवा यादी नाकारणे  हे दोनच पर्याय आहेत. तिसरा कोणताही पर्याय त्यांच्याकडे नाही”, असे  ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!