Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCrimeUpdate : साडेसात लाखाची लाच स्वीकारल्यावरून दोन पोलीस अधिकारी अटकेत

Spread the love

सोलापूर : पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करतो म्हणून साडेसात लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून रोहन खंडागळे या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस निरीक्षक संपत पवार यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पवार यांनी पोलीस खात्यात जवळपास 32 वर्षे सेवा बजावली आहे. अवघ्या चार महिन्यात त्यांची निवृत्ती देखील होती. मात्र निवृत्तीपूर्वीच लाचखोरीच्या गुन्ह्यात ते अडकले आहेत.

या विषयीची अधिक माहिती अशी कि , सोलापुरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्यात मुरूम चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांच्याकडे होता. मात्र गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले डंपर सोडण्यासाठी तसेच आरोपीला अटक न करण्यासाठी रोहन खंडागळे यांनी १० लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती साडेसात लाख रुपये द्यायचे ठरले. लाचेचे हे पैसे घेण्यासाठी सोलापुरातील जुना पुणे नाका परिसरात सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे गेला होता. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिल्याने आधीच याठिकाणी सापळा रचण्यात आला होता.

ठरलेल्या डीलनुसार सहायक पोलीस निरीक्षक खंडागळे पैसे स्वीकारण्यासाठी आल्यानंतर लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. यावेळी त्याची चौकशी केली असता हे पैसे पोलीस निरीक्षक संपत पवार यांच्या सांगण्यावरून त्यांच्यासाठी स्वीकारत असल्याची कबुली त्याने दिली. त्यावरून लाचलुचपत विभागाने पोलीस निरीक्षक संपत पवार आणि सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

दरम्यान पोलीस निरीक्षक संपत पवार आणि सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे यांच्याविरोधात कारवाई होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दोघांच्या ही घरात झडती घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत झडती घेण्याचे काम सुरूच होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!