Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरे !! शिवसेना आमदाराच्या “लेटर बॉम्ब”ने राज्याच्या राजकारणात खळबळ !!

Spread the love

ठाणे: राज्यात एकीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षाचा कालावधी यशस्वरीत्या पार पडेल असा दिलेला विश्वास आणि दुसरीकडे काँग्रेसने दिलेला स्वबळाची नारा घुमत असतानाच आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना थेट मोदींसोबत पुन्हा जाण्याची विनंती करणारे पत्र लिहिल्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून या पत्रामुळे महाविकास आघाडीच्या सरकारवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिलेली असताना भाजपचे प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी मात्र आ. प्रताप सरनाईक आणि इतर दोघांची जग जेलमध्येच असल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले आहे.


विशेष म्हणजे हे तेच आ. प्रताप सरनाईक आहेत ज्यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप व केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आ. सरनाईक शिवसेनेचे आमदार व ठाण्यातील वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. मात्र आता त्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी पुन्हा जुळवून घ्या, असे असे पत्र मुख्यमंत्री उद्धव टाकणारे यांना लिहून राज्याच्या राजकारणात ” लेटर बॉम्ब ” टाकल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आ. सरनाईक यांनी आपला मुद्दा मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना दोन पानांचं पत्र लिहिले असून सरनाईक यांच्या लेटरहेडवरील १० जूनचे हे पत्र आहे. सध्या ‘टॉप सेक्युरिटी’ प्रकरणात सरनाईक यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. गेल्या सात महिन्यांपासून ते या प्रकरणी कायदेशीर लढाई लढत आहेत. राज्यात सत्ता असतानाही या लढाईत सरकार वा अन्य नेत्यांचे सहकार्य मिळत नसल्याची खंतही त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

दरम्यान आ. सरनाईक यांनी पत्रातून महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असं म्हणणं सरनाईक यांनी मांडलं आहे. युती तुटली तरी युतीतील नेत्यांचे वैयक्तिक संबंध व जिव्हाळा अजूनही कायम आहे. तो तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरे

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याचा तुम्ही शब्द दिला होता. तो पूर्ण करून दाखवला. तुम्ही पदाला न्यायही देत आहात. पण या परिस्थितीही राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री व सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून केंद्राशी नकळत छुपी हातमिळवणी करताना दिसत आहेत. सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरे. हे माझे वैयक्तिक मत आहे. तसं झाल्यास निदान माझ्यासह अनिल परब आणि रवींद्र वायकर अशा इतर सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास थांबेल,’ असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

सेना आमदारांची कामे होत नाहीत

‘गेल्या दीड वर्षात मी आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी चर्चा केली. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचीच कामे कशी झटपट होतात, आपला मुख्यमंत्री असतानाही आपली कामे का होत नाही? अशी त्यांची भावना आहे. आमदारांमध्ये नाराजी आहे. एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. पण शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली आहे का? अशी चर्चा सुरू असल्याकडंही त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.

‘कोणताही गुन्हा नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा दलाल असलेल्या माजी खासदाराकडून बदनामी सुरू आहे. त्याला कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करताना आमच्या कुटुंबीयांवरही आघात होत आहे. एका प्रकरणातून सुटल्यानंतर जाणीवपूर्वक दुसऱ्या प्रकरणात गुंतवलं जात आहे. त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या प्रकरणात अडकवलं जात आहे.भाजपशी जुळवून घेतल्यास हे कुठेतरी थांबेल, अशी व्यथाही त्यांनी मांडली आहे.

‘पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत. युतीच्या नेत्यांमधील संबंध आणखी तुटण्याआधी पुन्हा जुळवून घ्यायला हवे. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल. साहेब, तुम्ही योग्य निर्णय घ्यालच. माझ्या मनातील भावना तुम्हाला कळवल्या. लहान तोंडी मोठा घास घेतला. काही चुकले असेल तर दिलगीर आहे, असंही सरनाईक यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.

उद्धवजींनी विचार केला तर … : चंद्रकांत पाटील

दरम्यान ‘सरनाईक यांच्या मतावर आम्ही बोलणं बरोबर नाही’ असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत बोलून दाखवलं आहे. ‘प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे नेते, आमदार आहेत. त्यांनी आपल्या पक्षप्रमुखांना, उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केलीय. उद्धवजींनी त्यावर विचार केला तर आमचे वरिष्ठ नेतेही त्याबाबत विचार करतील,’ असं सूचक वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.

तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न : नाना पटोले

प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. ‘तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. त्यामुळं काँग्रेसनं त्यावर मत व्यक्त करण्याची आवश्यकता नाही,’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

हा गंभीर आरोप : खा. संजय राऊत

संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या पत्रावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ‘एखाद्या आमदारानं मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं असेल तर त्यावर प्रतिक्रिया देण्यासारखं काय आहे? ते पत्रं खरं असेल तर त्यात एक मुद्दा आहे. तो तुमच्या माध्यमातूनच मला कळला आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असं त्या पत्रात म्हटलं आहे. हा गंभीर आरोप आहे. आता विनाकारण त्रास कोण कुणाला देतंय? तो विनाकारण त्रास काय आहे? याचा शोध घेणं गरजेचं आहे’, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

प्रताप सरनाईक जेलचे पाहुणे : किरीट सोमय्या

दरम्यान भाजपचे प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी मात्र या पत्रावर अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली असून आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि, शिवेसेनाचे आमदार प्रताप सरनाईक ” जेल” चा भीतीने चिंताग्रस्त दिसत आहेत आणि आता सरनाईकनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा यांच्याशी हातमिळवणी करावी अशी विनवणी केली आहे. सर्व घोटाळेबाज प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर …. जेलचे पाहुणे होणारच

आपलं सरकार

Click to listen highlighted text!