Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आधीच कोरोना त्यात पुन्हा म्युकरमायकोसिस… !! राज्य शासनाने केली उपचार दरांची निश्चिती

Spread the love

आधीच कोरोना त्यात म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशीच्या आजाराने राज्याची चिंता चांगलीच वाढली आहे. दरम्यान या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळू लागल्याने केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार राज्य सरकारने म्युकरमायकोसिसला साथरोग कायद्यांतर्गत साथीचा रोग म्हणून समाविष्ट करण्यात आल्यामुळे त्यानुसार निदानपद्धती आणि उपचारपद्धतींसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आता राज्य सरकारला मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात म्युकरमायकोसिसवर उपचार देणाऱ्या रुग्णालयांना या आजाराच्या उपचारांसाठीचे दर निश्चित करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार निश्चित दरांपेक्षा जास्त दर कोणत्याही रुग्णालयाला आकारता येणार नाहीत. राज्यभरात म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी काही रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले वसूल करीत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

वर्गवारीनुसार होणार दर आकारणी

म्युकरमायकोसिसचा उपचार देणारे रुग्णालय कोणत्या विभागात आहे, त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांची, शहरांची आणि भागांची विभागणी करण्यात आली असून त्यानुसार हे दर आकारले जातील. तसेच, कोणत्या सुविधा दिल्या जात आहेत, त्यानुसार प्रतिदिन कमाल किती दर आकारता येतील, हे सरकारने काढलेल्या आदेशांमध्ये स्पष्ट केले आहे.

या आदेशानुसार रुग्णालयांची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.

वॉर्ड आणि आयसोलेशनची सुविधा 

  • अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी ४ हजार रुपये प्रतिदिन,
  • ब श्रेणीसाठी ३ हजार रुपये प्रतिदिन तर
  • क श्रेणीसाठी २ हजार ४०० रुपये प्रतिदिन आकारता येतील.

आयसीयूशिवाय फक्त व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन

  • अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी ७ हजार ५०० रुपये प्रतिदिन,
  • ब श्रेणीसाठी ५ हजार ५०० रुपये प्रतिदिन तर
  • क श्रेणीसाठी ४ हजार ५०० रुपये प्रतिदिन आकारता येतील.

आयसीयू, व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन

  • अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी ९ हजार रुपये प्रतिदिन,
  • ब श्रेणीसाठी ६ हजार ७०० रुपये प्रतिदिन तर
  • क श्रेणीसाठी ५ हजार ४०० रुपये प्रतिदिन आकारता येतील.

शहरांची विभागणी 

अ श्रेणी : मुंबई विभाग (मुंबई महानगर पालिका, मीरा भाईंदर महानगर पालिका, ठाणे महानगर पालिका, नवी मुंबई महानगर पालिका, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, उल्हासनगर महानगर पालिका, अंबरनाथ महानगर पालिका, कुळगाव बदलापूर महानगर पालिका, पनवेल महानगर पालिका) पुणे विभाग (पुणे महानगर पालिका, पुणे कँटोनमेंट, खडकी कँटोनमेंट, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, देहूरोड कँटोनमेंट, देहू सीटी), नागपूर विभाग (नागपूर महानगर पालिका, दिगडोह सीटी, वाडी सीटी)

ब श्रेणी : नाशिक (नाशिक महानगर पालिका, एकलहरे, देवळाली कँटोनमेंट, भगूर नगरपरिषद), अमरावती महानगर पालिका, औरंगाबाद (महानगर पालिका आणि कँटोनमेंट), भिवंडी (महानगरपालिका आणि खोनी), सोलापूर महानगर पालिका, कोल्हापूर (महानगर पालिका आणि गांधीनगर), वसई-विरार महानगर पालिका, मालेगाव (महानगर पालिका, धायगाव, दरेगाव, सोयगाव, द्याने, मालदा), नांदेड महानगर पालिका, सांगली (सांगली-मिरज कुपवाड महानगर पालिका, माधवनगर)

क श्रेणी : अ आणि ब गट वगळता सर्व भाग

शस्त्रक्रियांचे दर देखील निश्चित!

दरम्यान म्युकरमायकोसिस आजारात शस्त्रक्रिया हा उपचारातील महत्वाचा घटक लक्षात घेऊन राज्य शासनाने २८ प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्चही निश्चित केला असून अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी १ लाख रुपयांपासून ते १० हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी ७५ हजार रुपयांपासून ते ७५०० रुपयांपर्यंत आणि क वर्गातील शहरांसाठी ६० हजार रुपयांपासून ते ६००० रुपयांपर्यंत दर ठरवून दिले आहेत.

कोणत्या रुग्णालयात होताहेत मोफत उपचार ? 

विशेष म्हणजे राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. त्यानुसार महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयातून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. मात्र खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उपचाराबाबात खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूरी दिली असून ही अधिसूचना आजपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यभर लागू राहणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!