MaharashtraNewsUpdate : राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार कि शिथिलता येणार ?

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन संपायला अवघे ८ दिवस उरलेले असताना १ जून नंतर राज्यात लॉकडाऊन कायम राहणार कि संपणार ? अशी चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. त्यांच्या मतानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी आणि मृतांचा आकडा कमी असेल त्या-त्या जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान असे असले तरी राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरीही ते एकाचवेळी शिथिल होणार नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले . या निर्बंधांमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता दिली जाईल, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊन संदर्भातले महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री काय म्हणाले ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या टास्कफोर्समधील डॉक्टरांशी बोलताना अप्रत्यक्षरित्या भाष्य करताना म्हटले आहे कि , १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेऊन केवळ चार दिवस झाले. कोरोनाची स्थिती आटोक्यात आलेली आहे. मात्र गेल्या लाटेच्या वेळी तुम्ही अनुभव घेतला आहे. गेल्या वेळी आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं. मात्र काही प्रमाणात शिथिलता आणली आणि त्यानंतर कोरोना चौपटीने वाढला. त्यामुळे सध्याच्या लॉकडाऊनचे काय परिणाम होतात हे पाहिलं जाईल. त्यानंतर निर्णय घेऊ. तसंच सध्याची परिस्थिती बघून लवकरच आढावा बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा करुन निर्बंध शिथील करायचे की नाही यावर निर्णय घेता येईल.