Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GoaNewsUpdate : गोव्यात ऑक्सिजन अभावी ७४ रुग्णांचा गेला जीव , मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार

Spread the love

गोवा : पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये रुग्णांचा मृत्यूच्या घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेत गोव्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच ऑक्सिजन अभावी करोना रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला धारेवर धरले  आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान गेल्या ४ दिवसात या रुग्णालयात ७४ रुग्णांनी जीव गमावला आहे. मंगळवारी २६, बुधवारी २०, गुरुवारी १५ आणि शुक्रवारी १३ रुग्णांची जीव गेला आहे. ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्य सरकारने ऑक्सिजन पुरवठ्यावरुन सुरु असलेल्या या गोंधळाप्रकरणी समिती नेमली आहे. तीन सदस्यीय समिती चौकशी करणार असून तीन दिवसांत अहवाल सादर केला जाणार आहे.

गोव्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात सर्वाधिक पॉझिटीव्हिटी रेट हा गोव्यात आहे. गुरुवारी रुग्ण वाढीचा दर ४८.१ टक्के इतका होता. गेल्या २४ तासात गोव्यात २ हजार ४९१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले  आहे. गोवा सरकारने  मेडिकल कॉलेजमधील ऑक्सिजन पुरवठ्याच्या प्रश्नावर समितीची नियुक्ती केली आहे. यात आयआयटीचे बीके मिश्रा, जीएमसीचे माजी अधिष्ठाते व्ही.एन.जिंदर आणि तारिक थॉमस यांचा समावेश आहे.

रुग्णालयांना केल्या जाणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या समितीला देण्यात आली आहे. याशिवाय समोर येणाऱ्या अडचणींवर तातडीने  तोडगा काढण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवसांत समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!