Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : गृहमंत्री देशमुख यांच्यावरील आरोपाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती चांदीवाल यांची समिती

Spread the love

येत्या ६ महिन्यांमध्ये शासनाला सादर करण्याचे आदेश


मुंबई : अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आणि खळबळजनक आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली  असून  उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीने आपला अहवाल येत्या ६ महिन्यांमध्ये शासनाला सादर करावा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. न्या . चांदीवाल हे औरंगाबाद येथील निवृत्त न्यायमूर्ती आहेत.

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना २० मार्च २०२१ रोजी गृहमंत्री देशमुखांवर आरोप करणारे पत्र लिहिले. त्या पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे गृहमंत्री देशमुख यांनी किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याचे निष्पन्न होईल असा काही पुरावा परमबीर सिंह यांनी त्यांच्या पत्रात सादर केला आहे का याबाबत ही समिती चौकशी णार आहे.

दरम्यान या बरोबरच सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील आणि सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून प्राप्त झालेल्या तथाकथित  माहितीच्या आधारे परमबीर सिंह यांची बदली झाल्यानंतर गृहमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एखादा गुन्हा केल्याचे निष्पन्न होते का याची चौकशी करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे तसे असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत किंवा इतर तपास यंत्रणांमार्फत ते तपासण्याची आवश्यकता आहे का, याबाबत ही समिती निर्णय घेणार आहे.

विरोधीपक्षांसह ज्यांच्यावर आरोप करण्यात आले ते खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील निष्पक्ष चौकशी व्हावी असे वाटत होते. अनिल देशमुख यांनी तसे पत्रच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. त्यानुसार आता ही चौकशी सुरू होणार असून या चौकशीतून कोणते सत्य बाहेर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!