Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : दुनिया : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या निषेधार्थ ढाक्यात आंदोलन, ४ ठार , २० जखमी

Spread the love

ढाका: बांगलादेश स्वातंत्र्यांचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि बंगबंधु शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहेत. ढाका विद्यापीठ परिसरात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी निदर्शने  करणाऱ्यांवर पोलिसांकडून रबरी बुलेट्सचा मारा करण्यात आला. ज्यात बांगलादेशमधील चित्तागोंग येथे चार जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.


बांगलादेशची राजधानी ढाका येथे देखील पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला काही  जणांकडून निषेध दर्शवण्यात आला. यावेळी पोलिसांसोबत झालेल्या संघर्षात दोन पत्रकारांसह अनेकजण जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घुसलेल्या व मोठ्या प्रमाणात तोडफोड करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा व रबरी बुलेट्सचा मारा केला. अशी माहिती रफिकुल इस्लाम या पोलीस अधिकाऱ्यांने रॉयटरला बोलताना दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मोदी तिथे  पोहचले आहेत. यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्याचे स्वागत केले व मोदींना गार्ड ऑफ ऑनर दिला गेला. या ठिकाणी पोहचल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांनी ढाकामधील सावर येथील शहीद स्मारकास भेट दिली. या ठिकाणी त्यांनी वृक्षारोपण केले  व तेथील व्हिजिटर्स बुकमध्ये संदेश लिहून स्वाक्षरी केली.

यानंतर ढाका येथील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी बांगलादेशातील बंधू व भगिनींना आणि येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझे वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती.”

दरम्यान, गुरुवारीच मोतीझील भागात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याविरोधात ‘जुबो अधिकार परिषदे’च्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला होता.  ढाका विद्यापीठ परिसरात गुरुवारी पंतप्रधान मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याविरोधात आंदोलन सुरू झाले आहे.  हे आंदोलन विविध डाव्या-पुरोगामी विद्यार्थी संघटनांचा सहभाग असलेल्या ‘प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स अलायन्स’च्यावतीने करण्यात आले होते. त्यावेळी सरकारचा पाठिंबा असलेल्या विद्यार्थी संघटनांना या आंदोलकांवर हल्ला केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

‘प्रोग्रेसिव्ह स्टुडंट अलायन्स’च्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या विरोधात वीसी चत्तर भागात आंदोलन सुरू होते. सत्ताधारी पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या बांगलादेश छात्र लीगच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आंदोलकांवर हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या आंदोलकांवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात येत आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!