Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शेतकरी आंदोलनावरून राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग

Spread the love

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत मंगळवारी निर्धारित कामकाज स्थगित करून, या मुद्यावर तत्काळ चर्चा करण्याची मागणी सभापतींकडून मान्य न करण्यात आल्याने काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, राजद, द्रमुक इत्यादी विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभात्याग केला.

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या, शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर या तीन विरोधी पक्षांनी चर्चेची मागणी केली होती. मात्र, सभापती व्यकंय्या नायडू यांनी ही मागणी अमान्य केली. राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर सभागृहात उद्या चर्चा होईल, तेव्हा शेतकरी आंदोलनावर सदस्य आपले मुद्दे मांडू शकतात, असे सांगितले मात्र विरोधकांना हा प्रस्ताव मान्य झाला नाही.

दरम्यान सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर सभापती नायडू यांनी सांगितले की, शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर चर्चेसाठी त्यांना नियम २६७ अंतर्गत विरोधी नेते गुलामनबी आझाद, तृणमूल काँग्रेसचे सुखेंदु शेखर राय, द्रमुकचे तिरूची शिवा, डाव्या पक्षाच ई करीम आणि विनय विश्वमसह अनेक सदस्यांची नोटीस मिळाली आहे. त्याला उत्तर देताना नायडू म्हणाले की, राष्ट्रपतींनी संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राच्या सुरूवातीस केलेल्या अभिभाषणात शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला आहे त्यामुळे लोकसभेत राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर आज चर्चा सुरू होईल आणि वरिष्ठ सभागृहात ही चर्चा उद्या बुधवारी होईल. त्यानुसार उद्या राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेवेळी सदस्य आपले म्हणणे मांडू शकतात. शेतकरी व सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होत आहेत.

कोण काय म्हणाले ?

यावेळी गुलामनबी आझाद यांनी म्हटले की, दोन महिन्यांपेक्षाही जास्त काळापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या मुद्यावर चर्चा करण्याची गरज आहे. तृणमूल काँग्रेसचे सुखेंद्र शेखर राय यांनी म्हटले की सरकार आणि शेतकरी यांच्यात काय सरू आहे, हे सभागृहाला माहिती नाही. राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेवेळी अन्य मुद्दे देखील समोर येतील. मात्र, शेतकऱ्यांच्या मुद्यावर स्वतंत्र चर्चा करण्याची गरज आहे. आम्ही विशेषकरून याच मुद्यावर चर्चा करू इच्छित आहोत. तर, माकपाचे करीम म्हणाले की, आंदोलनस्थळी कडाक्याच्या थंडीत शेतकरी बसलेले आहेत. त्यांचा वीज व पाणीपुरवठा बंद केला गेला आहे. द्रमुकचे तिरूची शिवा म्हणाले, हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे ज्यावर तत्काळ चर्चा करण्याची गरज आहे. राजदचे मनोज झा, बसपाचे सतीश चंद्र मिश्र यांनी देखील चर्चेची मागणी केली.मात्र विरोधकांची मागणी धुडकावून लावत, राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चेसाठी दहा तास आणि बजटवरील चर्चेसाठी दहा तासांची वेळ ठरवण्यात आलेली आहे, या संधीचा फायदा घ्या या आग्रहावर नायडू कायम होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!