Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : देश : सरकार भले काहीही म्हणो , आकडेवारी सांगते कि , कोट्यवधी कामगार लागले देशोधडीला…

Spread the love

केंद्र सरकारकडून देशाच्या अर्थव्यवस्थेचे गोडवे गायले  जात असले  तरी कोरोनाने अर्थव्यवस्थांना धक्का दिलाच तर दुसऱ्या बाजूला कोट्यवधी कामगारांना देशोधडीला लावले आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) नुकताच जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार कोरोना संकटात आशिया प्रशांत परिक्षेत्रात ८ कोटी १० लाख कामगारांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. यात सर्वाधिक तरुण आणि महिला कमर्चाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाचे मूळ चीनमध्ये असल्याचे बोलले जाते. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका आशिया खंडाला बसला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारतसह अनेक देशांनी कठोर टाळेबंदी लागू केली होती. यामुळे उद्योग धंदे ठप्प झाले. अनेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी नोकर कपातीचा मार्ग पत्करला.

आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या अहवालानुसार चालू वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीमध्ये आशिया प्रशांत क्षेत्रात ८१ दशलक्ष नोकऱ्या म्हणजेच ८ कोटी १० लाख नोकऱ्या बुडाल्या आहेत. त्याशिवाय येथील कामगारांचे उत्पन्न देखील सरासरी १० टक्क्यांनी घसरले झाले आहे. परिणामी इथल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) ३ टक्क्यांची घट झाली असल्याचा दावा या संघटनेने केला आहे. आशिया प्रशांत परिक्षेत्रात करोना संकटात कामाचे तासात देखील तिमाही स्तरावर घसरण झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत सरासरी १५.२ टक्क्यांची घट झाली. तर तिसऱ्या तिमाहीत १०.७ टक्क्यांची घट झाली आहे.

कोरोनाचा कामगार बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे. २०१९ मध्ये स्थानिक पातळीवर बेरोजगारीचा दर ४.४ टक्के होता. तो २०२० मध्ये ५.२ टक्के ते ५.७ टक्के इतका वाढेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या महासंचालक चिहोको असादा मियाकावा यांनी सांगितले. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनचा परिणाम भारतातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे ४० कोटी लोकांवर होण्याचा अंदाज यापूर्वी व्यक्त करण्यात आला होता. देशातील परिस्थितीमुळे त्यांच्या नोकऱ्या आणि उत्पन्नाच्या साधनांवर परिणाम होणार असून ४० कोटी लोक गरिबीच्या गर्तेत पडण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) व्यक्त केली होती. संघटनेच्या अभ्यासानुसार, या संकटामुळे या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते जून) ६.७ टक्के कामाचे तास नष्ट होती असा अंदाज आहे. याचाच अर्थ करोना विषाणूच्या साथीमुळे दुसऱ्या तिमाहीत १९.५ कोटी पूर्णवेळ नोकऱ्या संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!