MarathaAarakshan : ८ डिसेंबर… विधान भवनावर धडक मोर्चा ?

मराठा आरक्षणाचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. कोणत्याही सरकारने यावर ठोस निर्णय घेतला नसल्याने लाखो विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ८ डिसेंबर रोजी विधान भवनावर आपापल्या वाहनातून धडक मोर्चा काढला जाणार आहे असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे.
“राज्यात मुंबईत अधिवेशन होत असून त्या पार्श्वभूमीवर अनेक विषयावर चर्चा झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थी तरुणांची भरती झाली नाही. त्याच्या निषेधार्थ १ आणि २ डिसेंबर रोजी राज्यातील महावितरण अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी प्रत्येक जण वाहनातून विधान भवन येथे धडक मोर्चा काढणार आहे. पण एखाद्या वेळेस अधिवेशन पुढे घेतल्यास पुढील दिशा देखील लवकरच ठरविली जाईल,” असे कोंढरे यांनी सांगितले.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यामुळे विद्यार्थी वर्गांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच “राज्यातील मराठा समाजाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. यामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता राज्याचे महत्त्वाचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर पक्षांच्या सर्व प्रमुख नेते मंडळीनी एकत्रित बसून चर्चा केल्यास मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो,” अशी भूमिका राजेंद्र कोंढरे यांनी मांडली.