India Financial Update : चिंताजनक : जीडीपीची घसरगुंडी चालूच , ४० वर्षातील निच्चांकी आकडा , देशाची ऐतिहासिक मंदीच्या दिशेने वाटचाल
![](https://www.mahanayakonline.com/wp-content/uploads/2019/11/GDP1.jpg)
केंद्र सरकारने या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे आकडे जाहीर केले आहेत. मागच्या तुलनेत देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न जीडीपी आणखी खाली आला आहे. गेल्या ४० वर्षांतला जीडीपी चा हा निचांकी आकडा गाठला आहे. त्यामुळे ऐतिहासिक मंदीच्या दिशेने भारत चालला असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.
मोदी सरकारने जाहीर केलेल्या तिमाहीच्या आकड्यानुसार २०२०-२१ या आर्थिक वर्षातल्या जुलै ते सप्टेंबर दरम्यानची हि आकडेवारी आहे. या घोषित आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ७.५ टक्क्यांवर आला आहे. या तिमाहीच्या अंदाजाप्रमाणे किमान ८ टक्क्यांच्या वर तरी हा रेट असायला हवा होता. प्रत्यक्षात तो आणखी कमी झाल्याचं निदर्शनास आलं आहे. पहिल्या तिमाहीतच ऐतिहासिक अशी २३.९ टक्क्यांची घट जीडीपी मध्ये झाली होती. कोरोनाच्या संसर्गामुळे उद्योग-धंदे बंद होते. त्यामुळे हे चित्र होतं. आता दुसऱ्या तिमाहीकडून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात जाहीर झालेले आकडे पाहता, अजूनही अर्थव्यवस्था अडचणीतच असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान ही पडझड कायम राहिली तर भयंकर मंदीची लाट येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
देशातील कृषी उत्पन्न आणि औद्योगिक वाढ या दोन्ही क्षेत्रात विकास दर खालावला आहे. या दोन्ही क्षेत्रातल्या नुकसानीने जीडीपी खाली आला आहे. दोन लागोपाठच्या तिमाहींचा निकाल अपेक्षेपेक्षा कमी आल्यामुळे आता देशाची अर्थव्यवस्था तांत्रिकदृष्ट्या मंदीत असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच देशाची अर्थव्यवस्था ही मंदी अनुभवत आहे. रिझर्व बँकेने दिलेल्या अनुमानानुसार अर्थव्यवस्था वर्षभरात ९.५ टक्क्यांनी संकुचित होऊ शकते.
दरम्यान कोरोना व्हायरस, देशव्यापी लॉकडाऊन आणि त्यामुळे ठप्प असलेले व्यवहार खुले झाल्यानंतरही त्याला म्हणावी तशी गती आलेली नाही. सेवा क्षेत्रांसारख्या काही क्षेत्रात मात्र चांगली कामगिरी केलेली आहे. चीनमध्ये मात्र कोरोनाच्या साथीनंतर अर्थव्यवस्था वाढीचा वेग सुधारला आहे. चिनी अर्थव्यवस्था या दुसऱ्या तिमाहीत ४.९ टक्क्यांनी वाढली. मागच्या तिमाहीत हा वेग ३.२ टक्के होता.