Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबद्दल चिंता , पंतप्रधान ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी  मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ८ राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी एकामागून एक दोन बैठका घेणार आहेत. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ते आधी चर्चा करणार आहेत. दुसर्‍या बैठकीत मुख्यमंत्री किंवा अन्य राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींशी चर्चा होईल. या बैठकांमध्ये पंतप्रधान मोदी हे लस वितरण प्रक्रिया आणि करोनाची दुसरी लाट रोखण्यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करतील, असं सूत्रांनी सांगितल्याचं वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

दरम्यान केंद्र सरकारने कोरोनासंदर्भात नेमलेल्या टीमची गेल्या दोन दिवसांपासून बैठक सुरू आहे. या बैठकीत लशीची किंमत, खरेदी, लसीकरण प्रक्रिया, साठवण इत्यादी विषयांवर चर्चा झाली. यात निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) विनोद पॉल, सरकारचे मुख्य शास्त्रज्ञ सल्लागार के. विजय राघवन आणि केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांचा सहभाग होता. लशीच्या आपत्कालीन वापराबद्दलही या बैठकीत चर्चा करण्यात आली. लशीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी देण्यासाठी काही नियम बनवण्यात येतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

देशातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या ९१ लाखांवर  गेली आहे. आतापर्यंत ९१ लाख २९ हजार ३ नागरिकांना करोना संसर्ग झाला आहे. यापैकी ८५ लाख ५० हजार ९३१ नागरिक कोरोनामुक्त  झाले आहेत. सध्या ४ लाख ४२ हजार ४२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत देशात १ लाख ३३ हजार ५९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी गेल्या २४ तासांत ३३ हजार ९५ इतके नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ३० हजार ८९२ जण करोनामुक्त झाले आणि ३२७ जणांना मृत्यू झाला. या दरम्यान, करोना लस लवकरात लवकर नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने वेगात तयारी सुरू केली आहे. करोनावरील लशीच्या आपत्कालीन वापराबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. याचाच अर्थ क्लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर सर्व काही ठीक राहिल्यास सरकार या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!