MaharashtraNewsUpdate : शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊस तोडणी कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दराचा प्रश्न निकालात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे एका बैठकीत , ऊस तोडणी कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी १४ टक्क्यांनी वाढ करण्याचा खूप मोठा निर्णय आज घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर कामगारांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे , भाजप नेत्या पंकजा मुंडे आदींच्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी माहिती दिली. ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरवाढीबाबत दर तीन वर्षांनी करार करण्यात येतो. यावर्षीचा करार हा २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे. या करारानुसार ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीत सरासरी १४ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या कामगारांना सरासरी ३५ ते ४५ रुपयांनी मजुरी वाढवून मिळणार आहे. बैठकीत झालेल्या या निर्णयामुळे राज्यातील साखर कारखान्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये जास्त द्यावे लागणार आहेत, असे दांडेगावकर यांनी सांगितले. या निर्णयाला बैठकीत संबंधित सर्व संघटनांनी मान्यता दिली आहे. ऊस तोडणी कामगारांनी पुकारलेला संप यासोबतच मागे घेतला आहे, असे दांडेगावकर यांनी स्पष्ट केले.
सामाजिक न्याय विभाग गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे प्रश्न निश्चितपणे सोडवेल, असा आशावाद या बैठकीत शरद पवार यांनी व्यक्त केला. महामंडळाला बळकटी देण्यासाठी जी पावले उचलण्यात येत आहेत त्याबाबत पवार यांनी समाधान व्यक्त केले. महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे जास्तीत जास्त प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी नोव्हेंबरअखेर महामंडळाची नोंदणी करून डिसेंबरपासून महामंडळाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सूरू करण्याची सूचनाही शरद पवार यांनी केली.
यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे संजय खताळ यांच्यासह राज्यातील विविध ऊस तोड संघटनांचे प्रतिनिधी राज्य सहकारी महासंघाचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.