Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

LaturNewsUpdate : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचं लिगैक्य

Spread the love

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर आप्पा यांचं निर्वाण झालं आहे. त्यांचे वय १०४ वर्षे होते. महाराज काही दिवसांपासून आजारी होते, त्यांना अहमदपूर येथील त्यांच्या भक्तिस्थळ या मठातून उपचारासाठी नांदेड येथील काबदे हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते.  गेल्या चार -पाच दिवसांपूर्वी शिवलिंग शिवाचार्य महाराज  हे संजीवन समाधी घेणार असल्याची अफवा पसरल्याने त्यांच्या अहमदपुरच्या भक्तिस्थळ भागात हजारो लोक जमा झाले होते. अहमदपुर येथील मठाच्या ५० कोटी रूपयाच्या संपत्तीच्या वादातून हि अफवा पसरविण्यात येत असल्याची माहिती मिळताच  लातूरचे  जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्वतः महाराजांची भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली होती. राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्यावर नांदेड येथे उपचार चालू होते. त्यांची प्रकृती स्थिर होती परंतु अचानक त्यांचे निधन झाले.

अहमदपूर येथून नांदेड येथे जाताना त्यांनी त्यांच्या हडोळती आणि अहमदपूर येथील दोन्ही मठावर उत्तराधिकारी नेमले होते. पण आज त्यांची नांदेड येथे प्राणज्योत मालवली. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना आंध्रप्रदेश या राज्यात महाराजांचा खूप मोठा शिष्य परिवार आहे. महाराज वीरशैव लिंगायत समाजातील एक थोर व्यक्ती होते. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथे झालेल्या सभेत त्यांना नमन करून आपली सभा सुरु केली होती. संत जगतात त्यांचे नाव मोठे आहे. देशातील सर्व संत त्यांचा आदर करीत आले आहेत.

राष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी १९४५ साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते. लाहोर विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत, वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरलीय. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यातून त्यांना दोन वेळा तुरुंगवास देखील भोगला होता. अप्पांच्या जाण्याने लिंगायत समाज पोरका झाला असून समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच अहमदपुर येथील मठाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका शासकीय पथकाने त्यांची भेट घेऊन सर्व माहिती घेतली होती. या पथकात लातुरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत ,नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ बिपिन इटनकर,नांदेडचे पोलिस अधीक्षक यांचा समावेश होता. ही संपूर्ण चर्चा इन कॅमेरा घेण्यात आली आहे. त्यात महाराजांनी स्पष्ट केले आहे की, विद्यमान नूतन ट्रस्टी हे मी स्वत: नेमले आहेत. त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. अहमदपुर आणि हाडोळती येथील मठावर परवाच नेमलेले उत्तराधिकारी असतील. मुख्य बाब म्हणजे मठाच्या आणि ट्रस्ट च्या बाबतीत कोणत्याही पक्ष आणि संघटनेच्या हस्तक्षेप नको आहे.याच बरोबर ही सर्व माहिती राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या भक्तिस्थळ या ठिकाणी बोर्डावर लावण्यात यावी. माझ्या समाधीची खोटी माहिती कोणी दिली आहे? मला माहित नाही त्याचा योग्य तो तपासा करावा. दरम्यान राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यानी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना मानणाऱ्या भक्त संप्रदायात त्याची काय मते आहेत ती पोहचली आहेत. यामुळे पुढील काळात कलह होणार नाहीत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!