Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticsUpdate : काँग्रेस आमदारांचा सरकारविरोधात उपोषणाला बसण्याचा निर्णय

Spread the love

राज्यात सरकारमध्ये असतानाही निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतलं जात नाही हा काँग्रेसने घेतलेला आक्षेप ताजा असतानाच आता निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या काही आमदारांनी केला आहे. या आमदारांनी सरकारच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला आहे. काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल ठाकरे सरकारवर नाराज आहे. ठाकरे सरकार निधी वाटपात दुजाभाव करत आहे. त्यावर आम्ही नाराज आहोत. सर्वांना मतदारसंघात काम करायचं आहे. त्यामुळे निधी वाटप समानपद्धतीने झालं पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. आम्ही राज्यातील काँग्रेस नेतृत्वाकडे आमची नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील ११ आमदार नाराज असून आम्ही उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कैलास गोरंट्याल यांनी दिली.

दरम्यान राज्यात निधीचं समान वाटप होत नसल्याची तक्रार काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे करण्यात येणार असून त्याबाबत सोनिया गांधींची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गोरंट्याल यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्य सरकारसमोरचं विघ्न वाढलं आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक महत्त्व दिलं जात असल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. स्वत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याबाबत भेट घेतली होती. मात्र, त्यांना ठाकरे यांनी लवकर भेट दिली नसल्याने काँग्रेसमध्ये आणखीनच अस्वस्थता पसरली होती. अखेर ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर काँग्रेस नेते बॅकफूटवर गेले होते. त्यानंतर न विचारताच अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्याचा आक्षेप घेत चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीही ठाकरे यांना काँग्रेस नेत्यांची समजूत काढताना तारेवरची कसरत करावी लागली होती. आता थेट काँग्रेसच्या ११ आमदारांनी निधी वाटपावर असमाधान व्यक्त करत नाराजी दर्शवल्याने ठाकरे सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!