Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaEffect : गर्दी अपरिहार्य असली तरी नागरिकांनी गाफील राहू नका , मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Spread the love

कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस येण्यास डिसेंबर महिना उजाडणार असल्याने आणखी चार महिने असेच काढावे लागणार आहेत. आगामी काळात विविध धर्मिय सण असल्यानं पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. त्यामुळे गर्दी अपरिहार्य असली तरी नागरिकांनी गाफील राहू नये,’ असा सूचनावजा इशारा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. पुण्यातील सीईओपी कोव्हिड १९ रुग्णालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले त्यावेळी ते बोलत होते. पुण्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत स्वतंत्र कोव्हिड सेंटर तसंच वैद्यकिय व्यवस्था उभी करण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुसज्ज कोव्हिड सेंटर फक्त १८ दिवसांत बांधून पूर्ण केलं आहे. या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पार पडले.

‘डिसेंबरमध्ये लस येईलच पण महाराष्ट्रातील जनता ११ ते १२ कोटींच्या घरात आहेत त्यामुळं ती लस आल्यानंतर त्याची इम्युनिटी किती असणार, कशी मिळणार या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर तूर्त नागरिकांनी मास्क, हात धणे, एकमेंकापासून अंतर ठेवणं हे नागरिकांनी पाळणे हाच उपाय आहे. असंही ते म्हणाले. करोनाची लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येत असल्याचा जगभरातला अनुभव आहे, त्यामुळं जंबो कोव्हिड सेंटरची आवश्यकता आहे. रुग्णांची संख्या कमी होत असताना अशा जम्बो सेंटरची आवश्यकता आहे का असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र, यापुढे गाफील राहून चालणार नाही,’ असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, ‘पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या जम्बो सेंटरमध्ये अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अण्णासाहेब मगर मैदान येथे; तसेच बालेवाडी येथे जम्बो सेंटर उभारण्यात येत आहेत,’ असंही ते म्हणाले.

पुण्‍यातील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३२ हजार चौरस मीटर मैदानावर हे १३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे रुग्णालय उभे राहिले आहे. ६०० वातानुकूलित बेड, २०० आयसीयु बेड या रुग्णालयात आहेत. कोविड १९ रुग्णालयाचे उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, सौरभ राव उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!