IndiaNewsUpdate : मोठी बातमी : रेल्वेनंतर आता विमानतळांचं खासगीकरण, रोजगारासाठी देशात एनआरएची स्थापना, मोदी मंत्रीमंडळाचा निर्णय

मोदी सरकारच्या आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत National Recruitment Agency बरोबरच देशातल्या ६ विमानतळांचे खासगीकरण करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाअंतर्गत विमानतळांचे व्यवस्थापन आणि दैनंदिन व्यवहार खासगी संस्थेला देण्यात येणार आहे. विमान प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने हे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
याशिवाय राष्ट्रीय भरती संस्था , National Recruitment Agency संदर्भात माहिती देताना जावडेकर म्हणाले कि , देशातील युवा पिढीच्या नोकरीसंदर्भात मोदी सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून राष्ट्रीय भरती संस्था National Recruitment Agency स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा सीईटी देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल.
आपल्या गरजेप्रमाणे देशातील प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपापल्या परीक्षा ठेवतात आणि चांगल्या नोकरीच्या महत्त्वाकांक्षेने तरुण या सगळ्या परीक्षा देतात. आता मोदी सरकारने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे रोजगाराच्या क्षेत्रात मोठ्या बदलाची शक्यता आहे. या निर्णयानुसार आता सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सामायिक परीक्षा असेल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था कार्यरत राहील . या संस्थेत एकदा नोंदणी केली की, एकच परीक्षा देऊन तरुणांना आपली योग्यता सिद्ध करावी लागेल. त्यामुळे नोकरीसाठी दारोदारी परीक्षा देत भटकण्याची वेळ युवा पिढीवर येणार नाही. प्रकाश जावडेकर यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, “युवकांना अनेक ठिकाणी परीक्षा द्यायला जावं लागू नये म्हणून एकच सीईटी असेल. यात गुणवत्ता सिद्ध करून उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल.”