Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : पहिल्या अनलॉकनंतर पुन्हा महाराष्ट्रात परतू लागले परप्रांतीय कामगार

Spread the love

राज्यातील लॉकडाऊनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळूहळू सुरू झाले आहेत. यासाठी परप्रांतीय कामगार राज्यात परत येत आहेत. त्या सर्व कामगारांची योग्य नोंदणी व थर्मल तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. लॉकडाऊन कालावधीमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार वर्ग हा आपापल्या राज्यात परत गेला होता. तो आता महाराष्ट्रात मोठ्या संख्येने परत येऊ लागला आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड सह राज्याच्या इतर भागातही दररोज जवळपास साडे पंधरा हजार कामगार परत येत आहेत. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या सर्व कामगारांची यादी संबंधित राज्यांकडून आपल्याकडे पाठवण्यात येते. त्या यादीनुसार आलेल्या सर्व कामगारांची नोंद तसेच त्यांची थर्मल तपासणी करण्यात येते व त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारून त्यांना राहण्याच्या ठिकाणी होम क्वारंटाइनसाठी पाठवण्यात येते. मुंबई मध्ये बेस्ट मार्फत पाठवण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे, असे देशमुख यांनी नमूद केले.

अनलॉक १ नंतर राज्यातील गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर, पुणे या ठिकाणी सध्या साधारणतः ४ ते ५ हजार तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात अकरा ते साडेअकरा हजार परप्रांतीय कामगार दररोज येत आहेत. सध्या मर्यादित रेल्वे सुरू असल्याने ही संख्या कमी आहे, पण आपल्याकडील उद्योगधंदे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर या संख्येत निश्चितच वाढ होईल. त्यावेळी देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येईल असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन बिगिन अगेन म्हणत मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली. राज्यात सध्या कंटेनमेंट झोन वगळता सर्वत्र उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळे आपापल्या राज्यात गेलेले मजूर व कामगार पुन्हा आपली कर्मभूमी अर्थात महाराष्ट्रात येऊ लागले आहेत. या प्रत्येक मजूर व कामगाराची नोंदणी करण्याचे सरकाने आधीच निश्चित केले होते. त्यानुसार ही नोंदणी केली जात आहे. दरम्यान, लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर परराज्यातील मजुरांची मोठी कुचंबणा झाली होती. सर्व उद्योगधंदे बंद असल्याने या कामगारांना गावी परतायचे होते. मात्र ट्रेन बंद असल्याने या कामगारांची कोंडी झाली. दरम्यान, राज्य सरकारच्या सततच्या मागणीनंतर या कामगारांना घरवापसीसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या होत्या आता हेच कामगार महाराष्ट्रात पुन्हा पोहोचत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!