Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : उद्यापासून औरंगाबाद ६ तास सुरु , सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करण्याचे आवाहन

Spread the love

शहरात उद्यापासून ते 31 मे पर्यंत सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळात अन्नधान्य, किराणा, भाजीपाला आणि दूध खरेदी- विक्रीला परवानगी देण्यात आली आहे, या काळात नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवावे. तसेच मास्कचा वापर करावा. गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रात नियुक्त करण्यात आलेल्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी अधिक दक्ष राहून नागरिकांना नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करावे, अशा सूचना महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिल्या.


प्रतिबंधित क्षेत्रात नियुक्त करण्यात आलेल्या नियंत्रण अधिकाऱ्यांची बैठक आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मेसच्या परिसरात झाली. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, अपर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड, उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी, उपायुक्त वामन कदम, म्हाडाचे कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब शिंदे, सहायक आयुक्त शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, सरिता सूत्रावे, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले, मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोम्बे, विधी सल्लागार अपर्णा थिटे आदी उपस्थित होते.

बैठकीत प्रतिबंधित क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या क्षेत्रात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोविडबाबत जनजागृती करण्याबरोबरच प्रतिबंधित क्षेत्रात नियंत्रण अधिकारी, सहायक नियंत्रण अधिकारी व मनपा कर्मचाऱ्यांमार्फत सखोल देखरेख ठेवली जात आहे. होम क्वारटाईन केलेल्या व्यक्तीची आरोग्य तपासणी, धान्य किटचे वितरण, सुरक्षा व्यवस्था आदी बाबत नियंत्रण अधिकारी कार्यवाही करीत आहे. बेगमपुरा भागात आजपासून 50 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीची आरोग्य तपासणी केली जात आहे. आज सुमारे 90 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सदर कामासाठी लोकप्रतिनिधींबरोबरच नागरिकांचेही चांगले सहकार्य लाभत आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झोननिहाय वैद्यकिय अधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. आरेफ कॉलनी, आसेफिया कॉलनी, जयभीमनगर-डॉ.प्रेरणा संकलेचा, नूर कॉलनी-डॉ.पल्लवी हिवराळे, किले अर्क-डॉ.संगीता पाटील, संजयनगर, मुकुंदवाडी-डॉ. अंजली पाथरीकर, भिमनगर-डॉ. सुहासिनी पाटील, समतानगर-डॉ. सविता उबाळे, पुंडलिक नगर-डॉ.धनवले, बायजीपुरा गल्ली नं.3-डॉ.अलीमा खान, बेगमपुरा-डॉ.वंदना तिखे, सातारा SRPF-डॉ. बाबासाहेब उनवणे, कैलाशनगर-डॉ.तनविर, रामनगर, मुकुंदवाडी-डॉ. प्रेमलता कराड, सिल्कमिल कॉलनी-डॉ.डिंपल परदेशी. जनतेने लॉकडाऊनच्या काळात घाबरून जाऊ नये. धैर्याने परिस्थितीचा सामना करावा. प्रशासन आपल्या पाठीशी आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी व मनपा प्रशासक यांनी केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!