Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : कोरोनामुळे सहाव्या पोलिसाचा मृत्यू , २४ तासात १५७ पोलिसांना कोरोनाची बाधा , एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१४

Spread the love

राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर चालूच असून मुंबई पोलिस दलातील आणखी एका पोलिसाचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचा कोरोनासाठीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शनिवारी ही बाब उघडकीस आली. कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेल्या या सहायक फौजदाराच्या मृत्यूमुळे करोनाने मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या सहावर पोहोचली आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल वैद्यकीय सूत्रांनी सांगितले कि , कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यातील कार्यरत या सहायक फौजदारास मधुमेहाचा आजार होता. त्यात त्यांना दमा, श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी खासगी डॉक्टरकडे नेले. मात्र आजाराची लक्षणे पाहून त्यांना राजावाडी रुग्णालयात ६ मे रोजी दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्यांचे स्वॅब घेण्यात आले. उपचारादरम्यान रुग्णालयात शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजून येत नव्हते. त्यांच्या स्वॅबचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला त्यामुळे त्यांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान,  मुंबईसह राज्यात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात करोनाची लागण होत असल्याने पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून मुंबईत याआधी तीन पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे तर सोलापूर आणि पुणे येथे प्रत्येकी एका पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच सर्वसामान्यांचे रक्षणकर्ते असलेल्या पोलिसांनाही कोरोनाने टार्गेट केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण ७१४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातही चिंताजनक बाब म्हणजे मागील २४ तासांत १५७ पोलीस कोरोनाबाधित आढळले आहेत.

राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांमध्ये ८१ पोलीस अधिकारी आणि ६३३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या एकूण ७१४ प्रकरणांमधील ६४८ प्रकरणे अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर दिलासायक बाब म्हणजे आतापर्यंत ६१ पोलीस कोरोनाला हरवून घरी परतले आहेत. यामध्ये १० पोलीस अधिकारी तर ५१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे.  कोरोनामुळे ५ पोलिसांनी आपला जीव गमावल्यानंतर आता सहाव्या पोलिसांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलीसांचं मनोबल वाढवण्यासाठी व त्यांना विश्वास देण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरेंनी वरळीतील पोलीसांसोबत संवाद साधला.

याशिवाय मुंबईत कोरोना व्हायरसनं थैमान घातलं असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कोरोनाबाधित रुग्णानं हॉस्पिटलमध्येच आत्महत्या केला आहे.  मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. एका ६० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णानं थेट हॉस्पिटलच्या नवव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आठ दिवसांपूर्वा कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!