Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार सरकारचा पुन्हा आपल्या नागरिकांना महाराष्ट्रातून परत घेण्यास नकार ….

Spread the love

एका बाजूला सरकार परदेशात अडकलेल्या श्रीमंत भारतीय नागरिकांना विशेष विमानाने आणण्याची तयारी करीत आहे आहे आणि दुसरीकडे  इतर राज्यात अडकलेल्या  आपल्याच राज्यातील श्रमिकांना मात्र त्यांच्या घरात घेण्यास  मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी नकार दिल्यामुळे आपल्या राज्यात परत  निघालेल्या  मजुरांची मोठी अडचण झाली आहे . तर महाराष्ट्र सरकार समोरही या मजुरांना सुरक्षित निवारा आणि आरोग्याच्या सोयी पुरविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे .

याबाबत माहिती देताना पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटले आहे कि , मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांचे धोरण वेगवेगळे आहे. काही राज्यांनी नागरिकांना त्यांच्या राज्यांत घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे परवानगी देणाऱ्या राज्यांतील नागरिकांनाच त्यांच्या राज्यांत पाठविले जाणार आहे. त्यामुळे उर्वरित नागरिकांना आहे त्याच ठिकाणी राहावे लागणार आहे.

गेल्या ४५ दिवसांपासून लॉकडाउनमुळे त्रस्त झालेल्या  परराज्यांतील मजुरांना मूळ गावी जाण्यास परवानगी देण्यात दिल्यानुसार त्यांची माहिती संकलित करण्याची आणि अन्य प्रक्रिया सुरू करण्यात आली असतानाच त्यांच्याच सरकारने  पुन्हा एकदा मजुरांचा परतीचा मार्ग रोखला गेला आहे. काही राज्यांनी मजुरांना आपल्या राज्यांमध्ये घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्या राज्यांकडून परवानगी मिळाल्याशिवाय शहर आणि जिल्ह्यातील मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये जाता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान या पेच प्रसंगामुळे ‘संबंधित राज्यांकडून परवानगी देण्यात आल्यानंतर मजुरांना त्या राज्यांत पाठविण्याची परवानगी दिली जाईल. तोपर्यंत या नागरिकांनी आहे त्याच ठिकाणी थांबावे,’ असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. मजुरांना मूळ गावी जाण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे सहा हजार मजुरांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. तसेच, या मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, ‘परराज्यांमध्ये जाणाऱ्या कामगार विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी दवाखान्यांमध्ये गर्दी करू नये. परराज्यांत शंभर किंवा दोनशे अशा संख्येत गटाने जाणाऱ्या कामगारांची नजीकच्या ठिकाणी प्रशासनामार्फत वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.’ ‘दवाखान्यांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी गर्दी करणे धोक्याचे आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी याबाबत खबरदारी घेतली पाहिजे,’ असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!