#CoronaVirusUpdate : हिंगोली जिल्ह्यात करोनाचे आणखी चार रुग्ण; बाधितांची संख्या २१ वर, १६ जवानांनाच समावेश
मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात तीन एसआरपीएफ जवानासह जालना येथील एसआरपी जवानाच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीचा चाचणी अहवाल आज सकाळी प्राप्त झाला असून हे चारही जण करोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. यामुळे हिंगोली जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या २१ झाली असून त्यापैकी एका रुग्णाने करोनावर मात केली आहे. मालेगाव व मुंबई येथे बंदोबस्ताला गेलेल्या एसआरपीएफ जवानांपैकी आतापर्यंत १६ जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये हिंगोलीचे १५ तर जालना येथून हिंगोली तालुक्यात गावी आलेल्या एका एसआरपी जवानाला देखील करोनाची बाधा झाली आहे. या जवानाच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या चार वर्षीय पुतण्याला करोना झाला होता. तर औरंगाबाद येथून आई-वडिलांसह सेनगाव तालुक्यात परतलेला ५ वर्षाचा बालक करोनाग्रस्त झाल्याचे मंगळवारी समोर आले. हिंगोली जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २१ वरगेली आहे.
दरम्यान बुधवारी २९ एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी येथून वसमत येथे आलेला २१ वर्षीय तरुण व मुंबई येथून आलेल्या एका एसआरपी जवानाला देखील करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आज सकाळी एसआरपीचे तीन जवान व जालनाच्या जवानाच्या संपर्कातील एक व्यक्ती अशा दोन जणांचा चाचणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. व्यक्ती संपर्कातून दोन जणांना हिंगोलीत करोना झाल्यामुळे येथील लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.