Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus Effect : कोणाचे काय तर कोणाचे काय ? कोरोनाची बनावट लस टोचणाऱ्या तिघींना पोलिसांचा हिसका , तर चढ्या भावाने मास्क विकणारांवर पुण्यात कारवाई

Spread the love

कोरोना व्हायरसमुळे सर्व जग भयभीत असताना कोण लोक काय उचापती करतील सांगता येत नाही असाच एक प्रकार जालन्यात निदर्शनास आला आहे . तर कोरोनाच्या निमित्ताने लोकांकडून मास्कची वाढत चाललेली मागणी लक्षात घेऊन अधिक नफा  कमावण्याच्या उद्धेशाने जादा दराने मास्क विक्री करणारांवर पुण्यात कारवाई करण्यात आली आहे. जालन्यातील प्रकाराची माहिती अशी कि , जगात कुठेही कोरोनावरील कोणतीही लस अस्तित्वात नसताना जालन्यात मात्र कोरोनाची बनावट लस टोचून लोकांची दिशाभूल करून पैसे उकळणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिन्ही महिला स्वत: डॉक्टर आणि आरोग्यसेविका असल्याचं भासवत होत्या, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरू आहे.

कोरोना लसीच्या निमित्ताने लोकांची फसवणूक करणाऱ्या या महिलांची नावे  राधा रामनाथ सामसे, सीमा कृष्णा आंधळे आणि संगीता राजेंद्र आव्हाड  अशी असून या तिघीही बीडच्या रहिवासी आहेत. या तिघींनी अंबड तालुक्यातील पिंपळगाव येथे जाऊन लोकांच्या भेटी घेतल्या होत्या. कोरोना व्हायरसची लस आणल्याचं सांगून त्यांनी येथील लोकांना या लस टोचण्यास सुरुवात केली होती. दरम्यान काही गावकऱ्यांनी हा प्रकार ग्रामीण आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर महादेव मुंडे यांना सांगितला. त्यानंतर त्याची तक्रार करण्यात आली. या महिलांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून नकली लस आणि बॉटल जप्त करण्यात आल्या असून आरोग्य विभागाकडे तपासणीसाठी देण्यात आल्या आहेत. तिघींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनावरून नागरिकांमध्ये भीतीचे  वातावरण निर्माण झाले असून त्याचाच गैरफायदा घेऊन पैसे उकळण्यासाठी या महिलांनी जालन्यातील ग्रामीण भागातील लोकांना नकली लस टोचण्यास सुरुवात केली होती असे पोलिसांनी सांगितले.

पुण्यात जादा दराने मास्कची विक्री 

दरम्यान पुणे शहरात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने एमआरपी किंमतीपेक्षा जादा दराने मास्क आणि बोगस सॅनिटायझर्सची विक्री करणाऱ्या पुण्यासह म्हाळुंगे येथील चौघा औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या चौघांना पुढील आदेश येईपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. कोरोना  संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझर्सची मागणी वाढली आहे. या मागणीमुळे बाजारात उपलब्ध असलेल्या मास्कला अधिक भाव आला आहे. त्यामुळे पुण्याच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात किरकोळ विक्रेत्यांसह नागरिक मास्कचा कुठे विक्रीसाठी आहेत, याचा शोध घेत आहेत. ज्यादा दराने त्याची खरेदी करण्याची तयारीही त्यांची आहे. मास्कची गरज नसताना सुद्धा साध्या मास्कपासून ते ‘एन ९५’ मास्कच्या खरेदी विक्रीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहकांची लूट होत असल्याचे आढळले आहे. त्या संदर्भात विभागीय आयुक्तांकडे नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांना संबंधितांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एफडीएने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!