Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

औरंगाबाद विमानतळ नव्हे आता , छत्रपती संभाजी महाराज विमानतळ , औरंगाबादचे नाव बदलण्याचीही हालचाली तीव्र….

Spread the love

औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर असतानाच औरंगाबाच्या विमानतळाचे  छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याने आता औरंगाबाद विमानतळाचे औरंगाबाद हे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे  करण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नामांतराचे विषय औरंगाबादकरांसाठी चर्चेचे झाले आहेत. औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत निवेदन केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील “ धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ” असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. तसेच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल. यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे तर कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे करण्यात आले आहे याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या हालचाली वेगात सुरू असून, मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी महापालिकेत आतापर्यंत झालेले ठराव, न्यायालयात प्रलंबित प्रकरणे या बद्दलचा सविस्तर अहवाल राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने मागविण्यात आला असल्याचे वृत्त आहे.

उपलब्ध माहितीनुसार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत १९८८ मध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरच्या सभेत औरंगाबादचा उल्लेख पहिल्यांदा संभाजीनगर असा केला होता. तेव्हापासून हि मागणी प्रलंबित आहे. दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्येही असाच उल्लेख केला जातो. औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा पहिला ठराव महापालिकेत १९ जून १९९५मध्ये मंजूर करून तो राज्य शासनाकडे पाठवण्यात आला. राज्य शासनाने नोव्हेंबर १९९५मध्ये संभाजीनगरनावाची अधिसूचना प्रसिद्ध केली. त्याला मुश्ताक अहेमद यांनी हायकोर्टात आव्हान दिले. तेव्हा शहराचे नाव बदलण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे असा निर्णय कोर्टाने दिला. त्यानंतर २००१मध्ये विलासराव देशमुख सरकारने राज्य शासनाची अधिसूचना मागे घेतली. शिवसेनेने महापौर सुदाम सोनवणे यांच्या काळात१९९९मध्ये आणि महापौर अनिता घोडेले यांच्या काळात २०११मध्ये संभाजीनगरचा ठराव मंजूर केला. शिवसेनेचे रेणुकादास वैद्य यांनी स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या कार्यकाळात राज्य शासनाला पत्र पाठवून नामकरणाचे स्मरण दिले.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील ‘संभाजीनगर’वरच महापालिकेची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. भाजप नगरसेवकांनीही महापौरांना वारंवार स्मरणपत्र देत नामकरणाची मागणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामकरणाचा मुद्दा गांभीर्याने घेतल्याचे समजते. महापालिका निवडणुकीपूर्वी औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यानच याबद्दल घोषणा केली जाऊ शकते. त्या दृष्टीने राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘संभाजीनगर’बद्दल झालेले ठराव, न्यायालयीन प्रकरणांची माहिती तातडीने मागवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना या बद्दल मंगळवारीच (३ मार्च) आदेश देण्यात आले. त्यामुळे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय ‘संभाजीनगर’बद्दलची सर्व माहिती संकलित करण्यात येत होती. तातडीने हि सर्व माहिती राज्य शासनाला पाठवली जाणार आहे. शहाराचे नामकरण करण्याबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परिपत्रकानुसार आवश्यक ती परिपूर्ती करून सविस्तर प्रस्ताव तयार करणे, पूर्वीच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करणे, न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांची सद्यस्थितींची माहिती एकत्रित करणे, रेल्वे प्रशासन व पोस्ट खाते (टपाल खाते) यांचे ना हरकत प्रमाणपत्र ही सर्व कागदपत्रे जमा करण्याचे व त्याचा एकत्रित दस्तावज तयार करण्याचे काम सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!