Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर पिस्तुलधारी दरोडेखोर अटकेत

Spread the love

मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’च्या परिसरात वांद्रे पूर्वेतील कलानगर परिसरातून मुंबई पोलिसांनी एका अट्टल गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक केली आहे. हा गुन्हेगार ‘मातोश्री’च्या परिसरात कशासाठी आला होता, याची चौकशी आता पोलीस करत आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव इर्शाद खान असे आहे. त्याच्याकडून एक देशी पिस्तुल व सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. कलानगर सिग्नलजवळच्या एका फूटपाथवर इर्शाद खान संशयास्पदरित्या फिरताना दिसला. संबंधित आरोपी शस्त्रविक्रीसाठी या परिसरात येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

इर्शाद खान याच्यावर मुंबईसह गुजरातमध्ये खून, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुंबईतही त्याच्याविरोधात अनेक पोलीस ठाण्यांमध्ये दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री सामान्यपणे ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राहतात. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरही ‘मातोश्री’वरच राहण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्काच्या दृष्टीने  त्यांनी हा निर्णय घेतला होता. साहजिकच त्यांच्या या निर्णयानंतर ‘मातोश्री’ निवासस्थानाची सुरक्षा अधिक कडेकोट करण्यात आली आहे. असे असतानाही या परिसरात इर्शाद खान कसा आला, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!