CAB च्या विरोधात जानियातील विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरुद्ध आसाम, बंगाल पाठोपाठ आता दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातही विद्यार्थ्यांच्या हिंसक निदर्शनांमुळे विद्यापीठ परिसरात तणाव वाढला असून विद्यापीठातील सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या असून ५ जानेवारीपर्यंत विद्यापीठाला हिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. परीक्षांच्या नव्या तारखा येत्या काळात जाहीर करण्यात येतील, असे विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमांचे वर्गही १६ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ६ जानेवारी रोजी विद्यापीठ पुन्हा सुरू होईल , असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरुद्ध जामिया मिलिया इस्लिमियाच्या विद्यार्थांची तीव्र निदर्शने सुरू आहेत. शुक्रवारी संतप्त विद्यार्थ्यांनी संसदेच्या दिशेने मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. हा मोर्चा पोलिसांनी रोखल्याने पोलीस व निदर्शकांमध्ये जोरदार झटापट झाली. विद्यापीठ परिसरात निदर्शनांना हिंसक वळण लागले. यादरम्यान निदर्शकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली असता पोलिसांकडूनही त्यास प्रत्युत्तर देण्यात आलं. यावेळी आंदोलकांची धरपकड करून ४२ जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, दगडफेकीत १२ पोलीस जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. दुसरीकडे विद्यापीठ परिसरात उसळलेल्या हिसांचारात सुमारे १०० विद्यार्थी जखमी झाले असून त्यातील १० जणांची प्रकृती गंभीर असल्याचा दावा करण्यात येत आहे.
विद्यापीठ प्रशासनाने मात्र या आंदोलनात विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश नसल्याचा दावा केला आहे. विद्यापीठाच्या आजूबाजूच्या परिसरात जी निदर्शने करण्यात आली त्याचा विद्यार्थ्यांशी संबध नाही. विद्यार्थ्यांच्या नावाखाली बाहेरचे काही समाजकंटक आंदोलनात उतरले आहेत, असा दावा करण्यात आला आहे. याबाबत अंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनाही याबाबत पत्र लिहिण्यात येणार आहे.