Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वाद -विवाद : अटकेचे श्रेय घेण्यावरून , लूटमार , चोरी प्रकरणातील संशियित आरोपीच्या अटकेवरून औरंगाबाद , पुणे पोलिसांच्या माहितीत मोठी विसंगती !!

Spread the love

औरंगाबाद । जगदीश कस्तुरे

पुण्यातील चंदननगर भागातील आयआयएफएल गोल्ड लोन कार्यालयात रिव्हॉल्वरचा धाक दाखवून लुटमार केलेल्या प्रकरणात हव्या असलेल्या आरोपीच्या अटक प्रकरणावरून औरंगाबाद आणि पोलिसांनी काढलेल्या प्रेसनोटमध्ये कुठेही एकवाक्यता नसल्यामुळे श्रेय घेण्याच्या नादात विसंगती निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे. खरे तर या प्रकरणातील आरोपीला औरंगाबाद पोलिसांनी पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले परंतु पुणे पोलिसांच्या प्रेस नोट मध्ये मात्र या प्रकरणातील आरोपी सनीला औरंगाबाद पोलिसांनी अटक केल्याचा अथवा पुणे पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा  कोणताही उल्लेख नाही.

दरम्यान याबाबत चंदननगर पोलिसांना विचारले असता त्यांनी ‘महानायक ऑनलाईन’शी बोलताना  सांगितले कि , सनी केवलकुमार या आरोपीला औरंगाबाद पोलिसांनी पकडले नाही तर तो एनकाऊंटरच्या भितीने स्वतःच  औरंगाबाद बसस्थानकातील पोलिसांकडे जाऊन शरण आल्याचे  सांगितले तर औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काढलेल्या प्रेस नोट मध्ये त्याला गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि त्यांच्या टीमने पकडल्याची  माहिती छायाचित्रासह देण्यात आली आहे.

चंदन नगर आणि औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून येत असल्याने  फरार संशयित आरोपीला अटक केल्याचे श्रेय घेण्यातून हा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. पोलिसांमध्ये नेहमीच अशी स्पर्धा दिसून येते. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. त्यात पुन्हा याची भर पडली आहे.

या प्रकरणाची माहिती अशी कि , पुण्यातील आयआयएफएल गोल्ड लोनवर ५ डिसेंबर रोजी तिघांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून लुटमार केली होती. यावेळी लॉकरमध्ये तारण ठेवलेले १२ किलो सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. हा प्रकार घडल्यानंतर  मनिषा मोहन नायर (२९, रा. केअर आॅफ वायरल, नागपूर चाळ, एअरपोर्ट रोड, जेल रोड चौकीच्या समोर, येरवडा, पुणे) यांच्या तक्रारीवरुन चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान लुटारुंनी गुन्ह्यात वापरलेली कार सीसी टिव्हीच्या कॅमेऱ्यात  कैद झाली होती. त्यावरुन या कारचा (एमएच-२८-एएन-५०५०) पुणे शोध पोलिस घेत होते. तसेच हे लुटारु देखील सीसी टिव्हीत कैद झाले होते. त्याआधारे चंदननगर पोलिसांनी दीपक विलास जाधव (३२, रा. फ्लॅट क्र. ९, ज्युब्लेशन बिल्डींग, वाघोली, पुणे) हा संशयित आरोपी पोलिसांनी शोधून काढला. त्याला सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, अजित धुमाळ, तुषार खराडे, तुषार आल्हाट, चेतन गायकवाड, कृष्णा बुधवंत व सुभाष आव्हाड यांनी बुलढाणा येथून अटक केली. यावेळी त्याने तीन साथीदारांसोबत लुटमार केल्याची कबुली दिली होती. तसेच त्यात साथीदार सनी केवल कुमार (२९, रा. ८१२, सतरंजी चौक, लोणार गल्ली, पुणे) याचा सहभाग असल्याचे सांगितले होते. तसेच दीपककडून कार देखील जप्त करण्यात आली होती.


चंदननगर पोलीस म्हणतात एन्काऊंटरच्या भितीने सनीची शरणागती……..
दरम्यान चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या हैदराबाद एन्काऊंटर प्रकरण गाजत आहे. पुण्यातील गोल्ड लोनमधील सोने पिस्टलच्या धाकावर लुटारुंनी लुटल्याची माहिती पोलिसांकडे असल्याने ते देखील सशस्त्र होत या लुटारुंच्या मागावर होते. यातील एक आरोपी सनी केवलकुमार याने औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानका समोरील  एका लॉजमध्ये आश्रय घेतलेला होता. परंतु हैद्राबाद एन्काऊंटर प्रकरणाचा धसका घेऊन त्याने रविवारी पहाटे बसस्थानकातील पोलिस चौकी गाठली आणि  त्याने आपण पुण्यातील लुटमार प्रकरणातील आरोपी आहोत आपल्याला अटक करावी अशी स्वतःच मागणी करून शरणागती पत्करली. त्यामुळे त्याठिकाणी असलेले पोलिस अवाक् झाले. सनी अतिशय घाबरलेला असल्याने त्याला नेमके कोणत्या पोलिसांनी ताब्यात घेतले ते देखील पुणे पोलिसांना सांगता आले नाही.


औरंगाबाद पोलीस प्रेस नोटमध्ये म्हणतात आम्ही आरोपींना पकडले….

दरम्यान या प्रकरणात औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रेसनोट काढून त्यात म्हटले आहे कि , ७ डिसेंबर २०१९ रोजी औरंगाबाद गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि त्यांचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत मध्यवर्ती बसस्थानकाजवळ आले असताना त्यांना एक संशयित इसम दिसून आला . त्याची  विचारपूस करण्यासाठी त्याला थांबवले असता तो पळून जाऊ लागला,  संशय आल्याने त्यास पळत जाऊन ताब्यात घेतले व नाव गाव विचारले असता , त्याने त्याचे नाव सनी पिता केवलकुमार,  रा. पुणे असे सांगितले.  पुढे त्यास अधिक विचारपूस केली असता त्याने सांगितले की,  तो आणि त्याचे इतर दोन साथीदार यांनी दि.५  डिसेंबर २०१९ रोजी पुणे-नगर रोडवरील गोल्ड लोन कार्यालयावर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गोल्ड लोन तारण ठेवण्याच्या बहाण्याने गोल्ड लोन कार्यालयात प्रवेश करून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सुमारे १२० ग्राहकांचे ठेवलेले पोस्टकार्ड मधील सुमारे एक कोटी रुपयांचे सोने जबरीने चोरून घेऊन गेले.

याबाबत माहिती घेतली असता चंदन नगर येथील भाजी मार्केट परिसरातील आनंद एम्पायर या बिल्डिंगमध्ये हे कार्यालय असून  कार्यालयात सकाळच्या वेळी तेथे तीन  महिला कार्यरत असताना कार्यालयातील तिजोऱ्या उघड्या होत्या त्यावेळी आरोपीच्या साथीदारांपैकी सोने तारण ठेवून गोल्ड लोन घेण्याच्या बहाण्याने कार्यालयात प्रवेश केला त्याने व त्याच्या इतर दोन साथीदारांनी कार्यालयात शिरून बंदुकीचा धाक दाखवून सुमारे एक कोटी रुपयांचे दागिने जबरीने चोरून पळून गेले . या प्रकरणी चंदन नगर पोलिस ठाण्यात गु.र.नं.  434 /2019 कलम 392, 341, 34, 3, 25  आणि भारतीय हत्यार कायदा सह 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

करिता सदर आरोपी पुढील तपास कामी पोलीस ठाणे वाकड पिंपरी चिंचवड पुणे यांच्या ताब्यात दिले आहे.  सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद,  उपायुक्त मीना मकवाना, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर नागनाथ कोडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख,  संजय सिंह राजपूत, विठ्ठल सुरे,  ओमप्रकाश बनकर, अमर चौधरी आणि चालक याकोबा कांबळे यांनी केली आहे.


चंदननगर पोलिसांची प्रेसनोटमध्ये मात्र  औरंगाबाद पोलिसांचा उल्लेखच नाही….

या उलट चंदन नगर पोलिस ठाण्याच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये मात्र सनी केवलकुमार औरंगाबाद पोलिसांकडून ताब्यात मिळाला असा कुठेही उल्लेख नाही.  विशेष म्हणजे चंदन चंदन नगर पोलिसांच्या प्रेसनोटमध्ये नमूद केल्याप्रमाणे पुणे पोलीस पथकाने बुलढाणा येथे स्थानिक पोलिस स्टेशनचा बंदोबस्त घेऊन आरोपी दिपक विलास जाधव वय 32 राहणार वाघोली  यांच्यासोबतच  आरोपी सनी केवलकुमारचा उल्लेख आला आहे . त्यात केवळ एवढाच उल्लेख आहे कि , दीपककडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याच्या इतर तीन साथीदारांसोबत केल्याचे सांगून त्यापैकी एक साथीदार नामे सनी केवलकुमार व रा. पुणे याला ताब्यात घेण्यात आले आणि दोघांकडे केलेल्या तपासामध्ये सदर गुन्ह्यातील मुद्देमाल यापैकी एकूण आठ किलो 600 ग्राम अंदाजे असे सोन्याचे दागिने व स्विफ्ट गाडी नंबर एम एच 28 50 50 असा एकूण साधारण दहा तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल तपासकामी जप्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या प्रेस नोटमध्ये सदर आरोपी सनी केवलकुमार याला औरंगाबाद पोलिसांनी पुणे पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही तर औरंगाबाद पोलिसांच्या प्रेस नोट मध्ये त्यांनी सदर आरोपीला पोलीस ठाणे वाकड पिंपरी-चिंचवड पुणे यांच्या ताब्यात दिले असल्याचे नमूद करण्यात आले आहे जेंव्हा कि सदरचा  गुन्हा चंदन नगर पोलिस ठाण्यात नोंदवलेला आहे. असे असतानाही औरंगाबाद पोलिसांनी सदर आरोपी सनी केवलकुमार पोलीस ठाणे वाकड यांच्या  ताब्यात कसा दिला ? याविषयी मात्र कोणीही उत्तर देऊ शकले नाही.
……..
सोन्याचे दागिने हस्तगत…….
चंदन नगर पोलिसांनी प्रेसनोटमध्ये पुढे म्हटले आहे कि ,  दीपक व सनीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून त्यांनी आठ किलो सहाशे ग्रॅम सोन्याचे दागिने व कार जप्त केली. हि  सर्व कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली  चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके, प्रकाश पासलकर, सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, सोमनाथ टापरे, शिपाई मोहन वाळके, अजित धुमाळ, श्रीकांत गांगुर्डे, राजेंद्र दिक्षीत, पंडीत गावडे, रवि रोकडे, प्रदिप सोनवणे, तुषार खराडे, चेतन गायकवाड, तुषार आल्हाट, तुषार भिवरकर, शाकुर पठाण, कृष्णा बुधवंत, दीपक चव्हाण, अमित जाधव, दत्ता शिंदे, सुभाष आव्हाङ, संदीप येळे, परशुराम शिरसाट, विक्रांत सासवडकर, प्रशांत दुधाळ, अतुल जाधव व गिरीष नाणेकर यांनी केल्याचे नमूद केले आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!