Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एक नजर । महापरिनिर्वाण दिन विशेष । नेत्रदीपक व्हिडीओ : जाणून घ्या २६ अलीपूर रोड येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी ….

Spread the love

या स्मारकाचे एकूण क्षेत्र ७,३७४ चौरस मीटर असून ४,५६१.६२ चौरस मीटर जागेत बांधकाम झालेले असून या कार्यावर सुमारे २०० कोटी रुपये खर्च झाला आहे. येथील इमारतीस संपूर्ण हिरवा रंग  देण्यात आलेला असून स्मारकाच्या प्रवेशद्वारावर ११ मीटर उंचीचा  अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे आणि यांच्या मागे ध्यान केंद्र आहे. या स्मारकाच्या इमारतीची रचना उघडलेल्या  ग्रंथासारखी असून  हा ग्रंथ म्हणजे भारताचे संविधान आहे. ही रचना ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक मानली जाते. स्मारक परिसरात प्रदर्शन व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज वस्तुसंग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देणे, प्रदर्शनाचे आयोजन इत्यादी कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी बाबासाहेबांचा १२ फुट उंचीचा कांस्य धातूचा एक भव्य पुतळा, डिजीटल प्रदर्शनी, गौतम बुद्धांची ध्यानस्थ मुर्ती आहे. थ्री डी इफेक्ट द्वारे बाबासाहेब प्रत्यक्ष आपले विचार मांडताना दिसतात. येथे ध्यान केंद्र, बोधिवृक्ष आणि संगीतमय कारंजे देखील आहेत.

 

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन .  या दिवशी डॉ. बाबासाहेबांना आज देशभरात आणि विदेशातही आदरांजली अर्पण करण्यात येते. ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य राहिलेले आहे त्या त्या स्थळाला त्यांचे अनुयायी मोठ्या श्रद्धेने भेट देऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतात. यामध्ये त्यांची जन्मभूमी , महू , मध्य प्रदेश, चैत्यभूमी मुंबई, दीक्षाभूमी , नागपूर , बाबासाहेबांचे लंडनमधील स्मारक आणि ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले ते ठिकाण २६ , अलीपूर रोड , नवी दिल्ली या स्थळांना विशेष महत्वाचे स्थान आहे.

हे महत्व लक्षात घेऊन दिल्ली येथे  २६ अलीपूर रोड,  Dr. Ambedkar National Memorial   हे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले आहे. हे स्मारक बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आले आहे. बाबासाहेब केंद्रीय मंत्री असताना आणि त्यांच्यावर संविधान लिहिण्याची जबाबदारी असताना १, हार्डिंग ॲव्हेन्यू नंतर हेच त्यांचे निवासस्थान होते व येथेच त्यांचे  ६ डिसेंबर १९५६ रोजी  महापरिनिर्वाण झाले होते, त्यामुळे याला “महापरिनिर्वाण स्थळ” म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे या स्मारकाचे उद्घाटन व लोकार्पण  करण्यात आले.

या स्मारकातील इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार “ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक” आहे. स्मारकाला सुमारे २०० कोटी रूपये एवढा खर्च लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधीत पंचतीर्थ म्हणजेच पाच स्थळांचा विकास करण्याची घोषणा केंद्र आणि स्थानिक राज्य राज्य सरकारांनी केली असून हे स्मारक त्यापैकीच एक मानले जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९५१ मध्ये केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर  दिल्लीतील १, हार्डिंग ॲव्हेन्यू हे शासकीय  निवासस्थान सोडून ते २६ अलीपूर रोड इथल्या सिरोहीच्या महाराजांच्या निवासस्थानी राहायला आले. १९५१ ते १९५६ या काळात बाबासाहेबांचे वास्तव्य या घरात होते. तिथेच त्याचे ६ डिसेंबर, १९५६ रोजी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यामुळे ही वास्तू ‘महापरिनिर्वाण स्थळ’ किंवा ‘महापरिनिर्वाण भूमी’ म्हणून ओळखली जाते.

या स्मारक स्थळी कार्यरत असलेले डॉ. आंबेडकर राष्ट्रीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक विजय बौद्ध यांनी स्मारक लोकार्पणाच्या १२ वर्षांपूर्वीपासून या स्मारकासाठी संघर्ष सुरू केला होता. या घराचे स्मारकात रुपांतर करावे या मागणीसाठी बराच काळ आंदोलन झाले. त्यानंतर, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात आल्यावर ही वास्तू मूळ मालकाकडून ताब्यात घेण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी सोहळा समितीने २ डिसेंबर २००३ रोजी या घराचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला व वास्तुचे स्मारकात रुपांतर केले. या ठिकाणी भव्य स्मारकाची निर्मिती व्हावी म्हणून नवीन स्मारकाचा आराखडा तयार केला गेला, २१ मार्च २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले. दोन वर्षानंतर १२७ व्या आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला, १३ एप्रिल २०१८ रोजी नरेंद्र मोदींनी या स्मारकाचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!